आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सूर्यदत्तमध्ये ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा देशभक्तीमय जल्लोष

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 18, 2026
Spread the love

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षानिमित्त बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये राष्ट्राभिमान व देशभक्तीमय वातावरणात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रध्वजाला मानवंदना, विद्यार्थ्यांचे दिमाखदार संचलन, देशभक्तिपर गीत-नृत्य, स्केटिंग प्रात्यक्षिक, फॅशन शो, प्रेरणादायी भाषणे आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी संपूर्ण सूर्यदत्त कॅम्पस देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि प्रमुख पाहुणे कर्नल (डॉ.) गुरविंदर पाल सिंग (निवृत्त) व बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘मिशन सिंदूर’वरील प्रभावी नृत्याविष्कार सादर करीत भारतीय जवानांच्या शौर्याला आणि पराक्रमाला मानवंदना दिली.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दिमाखदार संचलनातून शिस्त, आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडले. स्केटिंग प्रात्यक्षिकातून कौशल्य, आत्मविश्वास, संतुलन आणि शिस्तीचे दर्शन घडले, तर फार्मसी विभागातील कुणाल कुमावत यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमात संगीताची रंगत वाढवली.

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या बीसीएची विद्यार्थिनी सलोमी लोंढे हिने स्वातंत्र्याचे महत्त्व, युवकांची जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीतील तरुणाईच्या भूमिकेवर प्रभावी विचार मांडले.

‘स्टाफ अँड स्टुडंट युनायटेड’ संकल्पनेवर आधारित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थ केअर अँड रिसर्चच्या विद्यार्थी व स्टाफने सादर केलेल्या अनोख्या फॅशन शोने कार्यक्रमात वेगळाच रंग भरला.

विद्यार्थी आणि शिक्षक हे केवळ शिक्षण प्रक्रियेतील घटक नसून एका कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत, हा एकतेचा संदेश या सादरीकरणातून देण्यात आला.

इंटिरिअर डिझायनिंगच्या मृणाल कोर्डे आणि तनिष्का घारे यांच्या सुंदर द्वंद्व नृत्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण समूह नृत्याने वातावरणात उत्साह निर्माण केला.

विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सादर केलेल्या या विविधांगी कार्यक्रमांतून ‘विविधतेत एकता’ या भारतीय मूल्याचे सुंदर आणि प्रभावी दर्शन घडले.

“पाच हजार वर्षांची समृद्ध परंपरा, विविध संस्कृती, भाषा, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाची ताकद असलेला भारत नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिला आहे.

अनेक परकीय आक्रमणांमुळे काहीसा मागे पडलेला भारत सध्या वेगाने प्रगती करत आहे. शांतता, अहिंसा आणि ‘विविधतेत एकता’ या मूल्यांच्या बळावर भारत येत्या काळात निश्चितच जागतिक महासत्ता बनेल.

अग्रस्थानी असलेल्या भारताला नेहमीच पुढे ठेवण्यासाठी तुम्हा सर्व युवाशक्तीला योगदान द्यायचे आहे,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी आपल्या मनोगतामध्ये नमूद केले.

नुकताच राष्ट्रपती पदक जाहीर झालेले पोलीस अधिकारी अरविंद पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “देशभक्तीची भावना केवळ स्वातंत्र्यदिनापुरती मर्यादित न ठेवता ती वर्षभर आपल्या मनात आणि कृतीत जपली पाहिजे.

व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक विचार, शिस्त आणि चांगल्या सवयी आत्मसात करा. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण ठेवून राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे,” असे आवाहन केले.

कर्नल (डॉ.) गुरविंदर पाल सिंग (निवृत्त) यांनी संविधानिक मूल्ये, शिस्त, राष्ट्रीय सुरक्षा आणि जबाबदार नागरिकत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.

“अपनी आजादी को हम हरगिज मिटा नहीं सकते; सर कटा सकते हैं, लेकिन सर झुका नहीं सकते,” असा जोशपूर्ण संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वाभिमानाने जगण्यासोबतच आपल्या संस्कृती, परंपरा आणि देशाच्या गौरवाचे जतन करण्याचे आवाहन केले.

या भव्य सोहळ्याचे नियोजन अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मोनिका सेहरावत, डॉ. सारिका झांबड, मॅनेजर (पीआर) स्वप्नाली कोगजे यांनी केले. डॉ. सुनील धनगर व विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रह्माकुमारी बावधन कॅम्पसचे बी. के. प्रकाश भाईजी, बी. के. रतन भाईजी आणि बी. के. राधिका दीदी यांची विशेष उपस्थिती होती. सूर्यदत्त ग्रुपच्या विविध संस्थांतील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध, सुरळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.