‘बुलडाणा अर्बन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापिकेवर गुन्हा
बुलडाणा अर्बन सोसायटीचे ३४ कोटी रुपयांचे केले आर्थिक नुकसान : लेखापरीक्षणात उघड झाला गैरव्यवहार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता सोसायटीतील खात्यांमध्ये अफरातफर करून सोसायटीचे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बुलडाणा अर्बन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे (वय ६८, रा. लॉ कॉलेज रोड) आणि विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे (वय ४४) व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत लेखापरीक्षक मोहन रघुनाथ दलाल (वय ५१, रा. बुलडाणा) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ जानेवारी २०१८ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष देशपांडे हे बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये पश्चिम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
योगिनी पोकळे या विभाग व्यवस्थापिका होत्या. त्यांनी सोसायटीमध्ये अफरातफर केल्याचे लेखापरीक्षण अहवालात समोर आल्याने दोघांना सोसायटीने डिसेंबर २०२५ मध्ये काढून टाकले होते.
त्यानंतर सोसायटीचे लेखापरीक्षण केल्यानंतर आता सोसायटीच्या वतीने लेखापरीक्षक मोहन दलाल यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.
शिरीष देशपांडे व योगिनी पोकळे यांनी संस्थेच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या पदाचा गैरवापर करून बुलडाणा को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या बुलडाणा बँकेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले.
नियमबाह्य कर्ज प्रकरणे मंजूर करणे, स्वतःच्या फायद्यासाठी शून्य टक्के दराने कर्ज घेणे, बुलडाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या फायद्यासाठी बिनव्याजी अॅडव्हान्स देणे, ही कंपनी बँकेची सबसिडियरी कंपनी दाखवणे व या कंपनीकरिता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची खोटी सही करून सदस्यत्व देणे व नंतर रद्द करणे, खोटे बॅलन्सशीट आरओसीच्या साइटवर अपलोड करणे, असे अनेक गैरप्रकार केले.
त्याचबरोबर सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता सोसायटीसाठी मालमत्ता खरेदी करणे, तारण न घेता कर्ज देणे, संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय व्याजाची रक्कम माफ करणे, तारण मालमत्ता विक्री करून या रकमा सोसायटीमध्ये न भरणे, परवानगीशिवाय मेंटेनन्सचा खर्च करणे, कर्जदाराच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम भरून ती इतर बँक खात्यात बेकायदेशीरपणे वळवणे, इतर खात्यांमध्ये अफरातफर करणे, अशा प्रकारे गैरव्यवहार करून त्यांनी संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे.
सोसायटीच्या वतीने तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्याची तपासणी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील तपास करीत आहेत.
