हाडोंग्री येथे श्री मल्लिकार्जुनंदी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथील ध्यान केंद्र परिसरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ‘श्री मल्लिकार्जुनंदी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारोह’ मोठ्या धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री. ष. ब्र. १०८ राचलिंग शिवाचार्य पंरडकर महाराज यांच्या अमृतहस्ते हा धार्मिक विधी पार पडला. संजीवनी बाळासाहेब पाटील, बाळासाहेब भगयंतराव पाटील व पाटील परिवार यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आदित्य बाळासाहेब पाटील, श्रुतीका पाटील, अमेय बाळासाहेब पाटील, रामांश आदित्य पाटील तसेच डीसीसी बँकेचे संचालक केशव सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने सकाळपासूनच ध्यान केंद्र परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. माणकेश्वर येथील प्रसिद्ध हेमाडपंथी महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीची हुबेहूब प्रतिकृती तसेच महादेवाची पिंड आणि मल्लिकार्जुन नंदी यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
त्यानंतर कलशारोहणाचा धार्मिक विधी पार पडला. सोहळ्याच्या प्रारंभी गणपतीपूजन, पुण्याहवाचन, सृष्टीवाचन, यज्ञ, कलशस्थापना, नवग्रहपूजन व नवग्रह कलशपूजन करण्यात आले.
त्याचबरोबर अंकुरार्पण, षोडशोपचार पूजा, शिव-पार्वती पूजन यांसह विविध धार्मिक विधी भक्तिभावाने पार पडले. यानंतर रुद्राभिषेक व रुद्र होम, यज्ञ, शिवसंकल्प तसेच देवमंत्रांचे हवन करण्यात आले.
मंत्रोच्चार, घंटानाद आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब मारकड, पंचायत समिती सदस्य प्रशांत मुंढेकर, खंडू गोयकर, वैजनाथ म्हमाने, संतोष लोखंडे, रवींद्र लोमटे, अमेय पाटील, दक्ष बाळ पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समस्त गावकरी व भजनी मंडळ, हाडोंग्री, ता. भूम, जि. धाराशिव यांच्या सहकार्याने हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला. श्रावण महिन्याच्या प्रारंभी झालेल्या या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यामुळे हाडोंग्री परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
