येरवड्यातील बालसुधारगृहातून पळालेले अल्पवयीन पुन्हा ताब्यात
अल्पवयीनांना फूस लावणाऱ्या दोघांना अटक : बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून पसार झालेल्या अल्पवयीनासह तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी पृथ्वी दीपक श्रीवास्तव (वय १८, रा. श्रीनगर, जि. गोंदिया), प्रेम एकनाथ जाधव (वय १८, रा. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई मार्केटयार्ड-गंगाधाम रस्त्यावर करण्यात आली.
येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात (बालसुधारगृहात) बाल न्याय मंडळाच्या आदेशाने गंभीर गुन्ह्यांतील अल्पवयीनांना ठेवण्यात येते.
बालसुधारगृहातून १३ ऑगस्ट रोजी रात्री सहा अल्पवयीन पसार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यापैकी एक अल्पवयीन आणि त्याला फूस लावणारे श्रीवास्तव व जाधव हे मार्केटयार्ड-गंगाधाम रस्त्यावर एका चहाच्या दुकानाजवळ थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार ताकपेरे, दड्डीकर, गायकवाड, कसबे यांना बातमीदाराकडून मिळाली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सूरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, अय्याज दड्डीकर, विनोद जाधव, सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, आकाश कसबे, रक्षित काळे, शिवाजी येवले, राहुल खाडे यांनी केली.
येरवड्यात जावे लागू नये म्हणून पळाले – पृथ्वी श्रीवास्तव आणि प्रेम जाधव यांना एका गुन्ह्यात पकडण्यात आले होते. त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. त्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याने त्यांना बालसुधारगृहातून येरवडा कारागृहात हलविले जाणार होते. त्यामुळे येरवडा कारागृहात जावे लागू नये म्हणून त्यांनी इतरांना फूस लावून बालसुधारगृहातून पलायन केले होते.
