५० कोटींच्या कर्जाच्या आमिषाने व्यावसायिकाची ४९ लाखांची फसवणूक
मित्राने हैदराबादमधील दोघांशी संगनमत करून घातला गंडा : तिघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : व्यवसायासाठी खासगी व्यक्तीकडून कर्ज मिळविण्याचा प्रयत्न करत असाल, तर पुण्यातील व्यावसायिकाला आलेला अनुभव सर्वांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. सिक्युरिटी एजन्सी चालविणाऱ्या व्यावसायिकाला १२ ते १४ वर्षांची मैत्री असलेल्या व्यक्तीने हैदराबाद येथील दोघांशी संगनमत करून ५० कोटी रुपयांचे कर्ज अल्प व्याजदरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची ४८ लाख ९३ हजार ५८० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नर्हे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सिंहगड रोडवरील एका ४९ वर्षीय व्यावसायिकाने नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मनोहर शिवलिंग जिंदम (रा. अयोध्यानगर, सावेडी, अहिल्यानगर), अशोक कुमार लाजीशेट्टी (वय ५२, रा. ममता रेसिडेन्सी, कुतुबुलापूर, रंगारेड्डी, तेलंगणा) आणि सौजन्या बोरा (वय ४३, रा. पुतळी बाऊली, एक्स रोड, कोटी, हैदराबाद, तेलंगणा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वडगाव येथील फिर्यादी यांच्या घरी १४ एप्रिल २०२४ ते आजपर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सिक्युरिटी एजन्सीचा व्यवसाय आहे. त्यांची एका मित्रामार्फत मनोहर जिंदम यांच्याशी ओळख झाली.
ते पुण्यात अनेकदा फिर्यादी यांच्या कार्यालयात येत असत. फिर्यादी यांना व्यवसायासाठी भांडवलाची गरज असल्याचे त्यांना समजले. त्यांनी हैदराबाद येथून अत्यंत कमी व्याजदरात पैसे उपलब्ध होतात आणि मी तुम्हाला ५० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
१२ ते १४ वर्षांची ओळख असल्याने फिर्यादी यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यांनी कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे ई-मेलद्वारे पाठवली. सुरुवातीला त्यांनी १५ हजार रुपये दिले.
त्यानंतर १५ जून २०२४ रोजी जिंदम हे वडगाव येथील कार्यालयात आले. त्यावेळी कर्ज प्रक्रियेसाठी १० लाख रुपये मागितले. तेव्हा फिर्यादी यांनी ते पैसे दिले.
त्यानंतर २४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांना हैदराबाद येथे नेण्यात आले. तेथे कर्जासाठी करारनामा करायचा असल्याचे सांगून २ लाख रुपये घेतले. त्यानंतर ते अशोक कुमार लाजीशेट्टी व सौजन्या बोरा यांच्याकडे घेऊन गेले.
हे दोघे मिळून एका संस्थेमार्फत कर्ज करून देणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत करार करावा लागेल, असे सांगण्यात आले. करारनामा करताना लाजीशेट्टी व सौजन्या बोरा यांनी एका बँक खात्यावर ५ लाख रुपये पाठविण्यास सांगितले.
करारनामा झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, आम्ही व्हेरिफिकेशनसाठी पुण्यात येऊ आणि त्यानंतर कर्जाची रक्कम तुम्हाला देऊ. त्यानंतर २९ मार्च २०२५ रोजी ते पाच जणांना घेऊन पुण्यात आले.
त्यावेळीही त्यांनी बँक खात्यावर ५ लाख रुपये पाठविण्यास सांगितले. तसेच १० लाख रुपये रोख घेतले. त्याचबरोबर हैदराबाद येथून पुण्यात ये-जा करण्यासाठी विमानाच्या तिकिटाचे ४३ हजार ५८० रुपयेही फिर्यादी यांनाच द्यावे लागले.
जिंदम यांच्या सांगण्यावरून एप्रिल २०२४ पासून त्यांनी वेळोवेळी रोख स्वरूपात २५ लाख रुपये आणि २३ लाख ८५ हजार ५८० रुपये ऑनलाइन पाठवले.
अशा प्रकारे एकूण ४८ लाख ८३ हजार ५८० रुपये कर्ज मिळेल, या आशेने त्यांनी दिले. त्यानंतर मनोहर जिंदम व अशोक लाजीशेट्टी यांच्याकडे विचारणा केल्यावर ते काही ना काही कारण सांगून थोड्या दिवसांत कर्ज मिळेल, असे सांगत होते.
आपली फसवणूक झाली असून पैसे परत मिळण्याची शक्यता नसल्याचे वाटल्याने त्यांनी अखेर फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.
जीवे मारण्याची धमकी – कर्ज मिळत नसल्याने आणि दिलेले पैसे परत करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने फिर्यादी हे मनोहर जिंदम याला घेऊन हैदराबादला गेले. लाजीशेट्टी व सौजन्या बोरा यांची भेट घेऊन कर्ज मिळणार नसेल, तर माझे पैसे परत द्या, असे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. “तुमको ज्यादा मस्ती आयी है क्या, काटके हैदराबाद के किसी गली में फेंक देंगे,” अशी धमकी दिली. त्यामुळे ते घाबरून पुण्यात परत आले. मित्र म्हणविणाऱ्या व्यक्तीने हैदराबादमधील दोघांशी संगनमत करून त्यांची ४९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे.
