मनातील नकारात्मकतेचे विषारी विचार दूर करा आणि आनंदी जीवन जगा : डॉ. बी. के. शक्तीराज
मनातील ताण, भीती, ईर्ष्या आणि नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्याचा दिला संदेश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मनातील विषारी विचार दूर करून सकारात्मक विचारांची कास धरली, तर जीवन अधिक आनंदी आणि समाधानी होऊ शकते, असा प्रेरणादायी संदेश प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, माउंट आबूचे ख्यातनाम आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर, विश्वविक्रम धारक आणि माईंड ट्रेनर डॉ. बी. के. शक्तीराज यांनी दिला. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटर, कोंढवा येथे गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विशेष प्रेरणादायी सत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सुमधुर भजनाने झाली. त्यानंतर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सरिता दीदी यांनी प्रास्ताविक करत डॉ. बी. के. शक्तीराज यांचा परिचय करून दिला.
श्री पूना गुजराती बंधू समाज आणि जयराज क्लबचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राजेश शहा यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन डॉ. बी. के. शक्तीराज यांचा सत्कार केला.
तसेच श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या महिला विभागाच्या उपप्रमुख हंसा शहा यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सरिता दीदी आणि सुजाता दीदी यांचा यथोचित सत्कार केला.
मार्गदर्शन करताना डॉ. बी. के. शक्तीराज म्हणाले की, “आपल्या जीवनाची दिशा आपल्या विचारांवर ठरते. मनामध्ये साचलेला ताणतणाव, भीती, ईर्ष्या आणि विषारी ठरलेले नकारात्मक विचार हे आपल्या आनंदाचे मारेकरी आहेत.
जोपर्यंत आपण मनातील हा कचरा साफ करत नाही, तोपर्यंत जीवनोत्सव साजरा करणे शक्य नाही.” त्यांनी माईंड मॅनेजमेंट आणि राजयोग मेडिटेशनच्या विविध सोप्या व व्यावहारिक युक्त्या उपस्थितांना प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवल्या.
सत्राच्या शेवटी उपस्थितांनी विविध प्रश्न विचारून आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घेतले. या जीवनदायी आणि प्रेरणादायी सत्राचा लाभ घेण्यासाठी श्री पूना गुजराती बंधू समाजाचे ट्रस्टी हरीश शहा, केतन कापडिया, दिलीप मेहता, तसेच दि. पूना गुजराती केळवाणी मंडळाचे प्रमोद शहा, डॉ. मधुसूदन झवर यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक, तरुणवर्ग आणि आध्यात्मिक क्षेत्रातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन जयराज ग्रुपच्या वतीने करण्यात आले.
