आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जप्त केलेला ५२ लाखांचा ऐवज तीन महिन्यांत मूळ मालकांना परत

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 10, 2026
Spread the love

पुणे : समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये दिल्लीतील दोन आरोपींना पोलिसांनी पकडले होते. त्यांच्याकडून ५२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. न्यायालयीन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा ऐवज अवघ्या तीन महिन्यांत मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या हस्ते ४५ लाख आणि ७ लाख रुपयांचा ऐवज दोन कुटुंबीयांना एका समारंभात परत करण्यात आला.

समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडीचे गुन्हे घडले होते. याचा तपास करीत असताना समर्थ व विश्रामबाग पोलिसांनी दोन्ही ठिकाणी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे दिल्लीतील असल्याचे निष्पन्न केले होते. त्यांचा शोध घेत असताना ते पुण्यात असून, बंडगार्डन परिसरातील एका लॉजमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून विश्रामबाग पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडले.

त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे व मोत्यांचे दागिने असा ५२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सर्व कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून आरोपींना अटक केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत सर्व परवानग्या मिळाल्या. त्यानंतर पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या हस्ते बुधवारी मूळ मालकांना हा ऐवज परत करण्यात आला.

चोरीला गेलेला मौल्यवान ऐवज पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परत मिळाल्याने संबंधित कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.