एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण
पोलिसांची शहरभरात नाकाबंदी : मध्यरात्री ५३ मिनिटांत तरुणाची सुटका, दोघांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचे नारायण पेठेतून मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चौघांनी अपहरण केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी करून अवघ्या ५३ मिनिटांत अपहरणकर्त्यांना पकडून या तरुणाची सिंहगड रोडवरून सुटका केली. मैत्रिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून हे अपहरणाचे नाट्य रंगले होते.
प्रसाद सूर्यवंशी (वय २८, रा. नारायण पेठ, मूळ रा. बारामती) असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सागर रमेश बोराडे (वय ३२, रा. वालचंदनगर) आणि किशोर बाळासाहेब सावंत (वय ३२, रा. दसूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद सूर्यवंशी व आरोपी सागर बोराडे यांची एका तरुणीबरोबर मैत्री आहे. सागर बोराडे हा हॉटेल व्यावसायिक आहे. प्रसाद आणि ही तरुणी दोघेही पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. प्रसाद हा या तरुणीशी बोलत असतो. या कारणावरून सागर याचा प्रसाद सूर्यवंशी याच्याशी वाद झाला होता.
त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता सागर बोराडे, किशोर सावंत आणि त्यांचे दोन साथीदार स्कॉर्पिओमधून नारायण पेठेत आले. त्यांनी प्रसादला बाहेर बोलावले. त्याला मारहाण करून स्कॉर्पिओमध्ये कोंबून त्याचे अपहरण केले.
याची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष ११२ ला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिळाली. पोलिसांनी तातडीने संपूर्ण शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर नाकाबंदी केली. स्कॉर्पिओ सिंहगड रोडच्या दिशेने गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तेथे नाकाबंदी करून वाहन अडवले आणि प्रसाद सूर्यवंशी याची सुटका केली. गाडीतील दोघांना पकडण्यात आले. विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.
