खंडणी उकळणार्या टोईंग व्हॅनवरील चालकासह तिघांना अटक
१० हजाराच्या दंडाची घातली होती भिती : ३ हजार रुपयांची उकळली खंडणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चुकून नो पार्किंगमध्ये कार पार्क केली असताना ती टोईंग करून उचलून नेण्यात आली. कार महाराष्ट्रात पासिंग करून घेतली नाही, पीयूसी संपलेली आहे, अशी कारणे दाखवून १० हजार रुपये दंड पडेल, अशी भीती टोईंग व्हॅन चालक व त्याच्या साथीदारांनी दाखविली. त्यानंतर कोणतीही पावती न देता ३ हजार रुपये उकळले. वाहतूक विभागाकडून होत असलेल्या कारवायांमध्ये हे प्रकार सर्रास सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. पोलिसांनी टोईंग व्हॅन चालक व त्यावरील दोन कामगारांना अटक केली आहे.
आकाश नवनाथ सावंत (वय २२, रा. स. टा. वाडी मळा, कोरेगाव पार्क), समीर अतिक अन्सारी (वय ३०, रा. प्रायव्हेट रोड) आणि शेख शौकत अतिक अन्सारी (वय ३०, रा. ताडीवाडा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अमोल आनंद भिलारे (वय ४६, रा. साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथील लेन नंबर ६ मध्ये २० जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची गाडी नजरचुकीने नो पार्किंगमध्ये पार्क करून गेले होते. टोईंग व्हॅनवरील दोन कामगार आणि चालक यांनी ही कार टोईंग करून नेली होती.
फिर्यादी यांच्या कारचे दीव-दमण येथील आरटीओ पासिंग आहे. तिचे महाराष्ट्रात पासिंग करून घेतले नाही व पीयूसी संपलेली असून ती काढलेली नाही, अशी कारणे सांगून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांना १० हजार रुपये दंडाची भीती घालून त्यांच्याकडून ३ हजार रुपये रोख खंडणी स्वरूपात घेतली. त्यांना कोणतीही पावती दिली नाही.
त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. टोईंग व्हॅन चालकांकडून हे प्रकार सर्रास सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मध्यस्थीतून त्यांनी खंडणीविरोधी पथकाकडे याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी टोईंग व्हॅनचा शोध घेऊन त्यावरील तिघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत चव्हाण तपास करीत आहेत.
