राखीच्या एका धाग्याने जोडली मनांची नाती
व्हीटीपी ग्रुपमध्ये रक्षाबंधनाचा अनोखा उत्सव : प्रत्येक मनगटाला मिळाला आपुलकीचा स्पर्श
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर विश्वास, स्नेह आणि नात्यांना अधिक घट्ट करणारा भावनिक उत्सव आहे. याच भावनेला अनोख्या पद्धतीने साकारत व्हीटीपी ग्रुपच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी विशेष रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प. पू. डॉ. श्री. प्रणवदर्शनाजी म. सा., प. पू. श्री ईशदर्शनाजी म. सा. झूम मीटिंगद्वारे उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत जैन विधीप्रमाणे मंगलिक देऊन कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमातून पारंपरिक भाऊ-बहिणीच्या नात्याला एक नवा आयाम मिळाला आणि कार्यस्थळावरही कुटुंबासारखी आपुलकी व जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण झाले.
व्हीटीपी ग्रुपचे संस्थापक व चेअरमन विलासकुमार पालरेशा यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे रक्षाबंधनाचा आनंद केवळ ज्यांना भाऊ किंवा बहीण आहे अशाच कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित न ठेवता, ज्यांच्या आयुष्यात भाऊ किंवा बहिणीचे नाते नाही, अशा कर्मचाऱ्यांनाही या आनंदात सहभागी करून घेण्यात आले.
ज्या महिला कर्मचाऱ्यांना भाऊ नाही, त्यांना सहकाऱ्यांच्या रूपाने भावाचे प्रेम आणि आपुलकी मिळाली, तर ज्या पुरुष कर्मचाऱ्यांना बहीण नाही, त्यांनाही या निमित्ताने बहिणीचे नाते अनुभवता आले.
या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भावनिक जिव्हाळ्याची नवी नाती निर्माण झाली. राखीच्या धाग्याने केवळ मनगटच बांधले नाही, तर सहकाऱ्यांच्या मनामनांना विश्वास, स्नेह आणि आपुलकीच्या नात्याने जोडले.
सोहळ्यादरम्यान कर्मचाऱ्यांनी एकमेकांना राखी बांधून स्नेह, आदर आणि सहकार्याची भावना व्यक्त केली. अनेक कर्मचाऱ्यांसाठी हा अनुभव विशेष आणि भावनिक ठरला.
रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ किंवा बहिणीच्या नात्याची उणीव जाणवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व्हीटीपी ग्रुपची ही पहल आनंद, आपुलकी आणि नव्या भावनांनी भरलेली ठरली.
विलासकुमार पालरेशा यांचे मत आहे की, कोणत्याही संस्थेची खरी ताकद केवळ तिच्या कामगिरीत आणि यशात नसते, तर त्या संस्थेशी जोडलेल्या व्यक्तींमधील आपुलकी, विश्वास आणि परस्पर संबंधांमध्ये असते.
याच विचारातून व्हीटीपी ग्रुपने कर्मचाऱ्यांमधील विश्वास, आदर, सहकार्य आणि भावनिक नाते अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम राबविला.
या उपक्रमातून नाती केवळ रक्ताच्या नात्यांनी तयार होत नाहीत, तर प्रेम, विश्वास, काळजी आणि आपलेपणातूनही ती तितकीच घट्ट होतात, असा सुंदर संदेश देण्यात आला.
या रक्षाबंधन सोहळ्यामुळे काही काळासाठी कार्यालय हे केवळ कामाचे ठिकाण न राहता एका मोठ्या कुटुंबासारखे भासले. व्हीटीपी ग्रुपच्या या अनोख्या उपक्रमाने रक्षाबंधनाला केवळ परंपरेपुरते मर्यादित न ठेवता मानवी संवेदना, आपुलकी आणि नाती जोडणारा भावनिक उत्सव म्हणून नवी ओळख दिली.
