‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून सीओईपीमध्ये राडा
काँग्रेस, अभाविप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची : काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमावरून सीओईपीमध्ये युवक काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम शनिवारी (२२ ऑगस्ट) एसएसपीएमपीएस प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सायंकाळपासून या भागातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली.
काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी सीओईपीच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आणि विद्यार्थ्यांना खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला.
शनिवारच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने घेऊन जाण्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी सुरू केली.
यावेळी काँग्रेस आणि अभाविप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गट एकमेकांशी हाणामारी करीत होते.
त्यात एका अभाविपच्या कार्यकर्त्याला एनएसयूआयचे कार्यकर्ते बेदम मारहाण करत होते. हे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीमार करून मारहाण करणाऱ्यांना पांगविले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
या प्रकरणात काही काँग्रेस कार्यकर्तेही जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना समजल्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते घटनास्थळी जमले.
काँग्रेसच्या जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची काँग्रेस नेत्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. अभाविपने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत काँग्रेस, भाजप आणि अभाविपकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले.
तेथे एकाला बेदम मारहाण केली जात होती. त्याला वाचविण्यासाठी व मारहाण करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आहे.
भाजपकडून तक्रार दिल्यानंतर काँग्रेसच्या ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसकडून कोणतीही तक्रार आली नाही, असे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले.
सीओईपीमध्ये नेमके काय घडले – सीओईपीच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीने राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जाण्यावरून हा वाद निर्माण झाला होता. एका विद्यार्थिनीने केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यावरून अभाविप आणि एनएसयूआय कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या विद्यार्थिनीने राहुल गांधींच्या कार्यक्रमात जाऊन हे प्रश्न मांडणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. या व्हिडिओवरून अभाविपचे कार्यकर्ते सीओईपीच्या वसतिगृहात गेले. तिला खोलीत बंद करून ठेवले. तिला धमक्या देणे व राहुल गांधींच्या कार्यक्रमाला अजिबात जायचे नाही, अशी धमकी दिली. हे समजल्यावर एनएसयूआयचे कार्यकर्ते तेथे जमले. त्यातून दोन्ही गट एकमेकांना भिडले.
