मोबाईल प्रामाणिकपणे पोलिसांकडे जमा, यश कुंकूलोळ व स्वराज लोखंडे यांच्या तत्परतेमुळे मालकाला परत
सापडलेला मोबाईल स्वतःकडे न ठेवता पोलिसांच्या स्वाधीन : दोघांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : सायंकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त ४२२ परंडा रोड परिसरातून दुचाकीवरून जात असताना यश कुंकूलोळ व स्वराज लोखंडे या दोघांना रस्त्यावर एक मोबाईल पडलेला दिसला. मोबाईल स्वतःकडे न ठेवता त्यांनी तो बार्शी शहर पोलिस ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला.
हा मोबाईल निरंजन दत्तात्रय भोसले, रा. ढगेमळा यांचा होता. दुचाकीवरून जात असताना त्यांच्या खिशातून ४२२ परंडा रोड परिसरात मोबाईल पडला होता.
मोबाईल सापडल्यानंतर यश कुंकूलोळ व स्वराज लोखंडे यांनी तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल लॉक असल्याने मालकाची ओळख पटत नव्हती. डिस्प्लेवर केवळ निसर्गाचे छायाचित्र होते.
मोबाईल सापडल्यानंतर सुमारे १५ ते २० मिनिटे त्यांनी प्रतीक्षा केली. मात्र, या काळात मोबाईलवर कोणाचाही फोन आला नाही. त्यामुळे मोबाईल स्वतःकडे ठेवण्याऐवजी तो पोलिसांकडे जमा करण्याचा निर्णय घेत दोघांनी बार्शी शहर पोलिस ठाणे गाठून मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केला.
मोबाईल पोलिसांकडे जमा केल्यानंतर सुमारे दहा मिनिटांनी निरंजन भोसले यांचा पोलिस ठाण्यात फोन आला. “माझा मोबाईल कोणाकडे आहे?” अशी त्यांनी पोलिसांकडे विचारणा केली.
त्यावेळी पोलिसांनी त्यांना, “आपला मोबाईल रस्त्यावर पडला होता. तो एका व्यक्तीने पोलिस ठाण्यात आणून जमा केला आहे. आपण पोलिस ठाण्यात येऊन मोबाईल घेऊन जावा,” अशी माहिती दिली.
त्यानंतर निरंजन भोसले पोलिस ठाण्यात आले. आवश्यक खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी मोबाईल त्यांच्या स्वाधीन केला. मोबाईलमध्ये कुटुंबातील सदस्यांचे तसेच घरातील महत्त्वाचे फोटो असल्याने मोबाईल परत मिळाल्याचा त्यांना मोठा दिलासा मिळाला.
मोबाईल परत मिळाल्यानंतर निरंजन भोसले यांनी यश कुंकूलोळ व स्वराज लोखंडे यांचे मनापासून आभार मानले. सापडलेला मोबाईल स्वतःकडे न ठेवता तो पोलिसांकडे जमा केल्याबद्दल त्यांनी दोघांचेही कौतुक केले आणि त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
या दोन्ही तरुणांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होत असून, सापडलेली वस्तू स्वतःकडे न ठेवता ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची भावना आजही समाजात जिवंत असल्याचे या घटनेतून दिसून आले.
