सायबर व्हेंचर : डिजिटल सुरक्षिततेचा जागर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : डिजिटल युगात वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, नागरिक आणि समाजामध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘सायबर व्हेंचर’ या इनडोअर मास ॲक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव, महार्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या एलएमसीचे सदस्य व सचिव, एसएनडीटीच्या विद्यार्थी विकास विभागाचे अधिष्ठाता नितीन प्रभू तेंडुलकर, संस्थेचे डॉ. आनंद लेले आणि रविंद्र देव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांनी ‘सायबर व्हेंचर’ या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
हा उपक्रम महार्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनघा वैद्य, विभागप्रमुख प्रा. रुपाली सराफ आणि शिक्षक समन्वयक मनाली सपकाळ यांचे मार्गदर्शन, तसेच उपक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
त्यामुळे उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले सायबर नृत्याचे सादरीकरण. नृत्य, संगीत आणि सायबर सुरक्षा संदेश यांचा प्रभावी संगम साधत एकदाच वापरला जाणारा संकेतांक, बनावट दुवे, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता, ऑनलाइन फसवणूक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार याबाबत जनजागृती करण्यात आली.
या सादरीकरणाला उपस्थित मान्यवरांसह सर्व सहभागींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी आणि सर्व सहभागी यांनी एकत्रितपणे ‘सायबर शपथ’ घेत सायबर सुरक्षिततेच्या जबाबदार सवयी अंगीकारण्याचा संकल्प केला.
संकेतशब्द, एकदाच वापरला जाणारा संकेतांक आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे, संशयास्पद दुव्यांपासून सावध राहणे, तसेच कोणताही डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहण्याचा संदेश या सामूहिक शपथेतून देण्यात आला.
‘सायबर व्हेंचर’ या उपक्रमातून सर्जनशील सादरीकरण, सामूहिक सहभाग आणि सायबर सुरक्षेचा संदेश यांचा सुंदर संगम घडून आला.
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या संकल्पनेतून सुरक्षित, सजग आणि जबाबदार डिजिटल समाज घडविण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
