आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणावर वार करून खुनाचा प्रयत्न करणारे चौघे जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 27, 2026
Spread the love

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना बिबवेवाडी पोलिसांनी धायरीतून आठ तासांत अटक केली आहे.

प्रदीप पिंटू कश्यप (वय १९, रा. शिवतेजनगर, खडके वस्ती), मयूर रोहिदास चव्हाण (वय २०, रा. विघ्नहर्तानगर), तेजस सोमनाथ आंबुरे ऊर्फ भोला (वय २६, रा. अप्पर ओटा) आणि शरद पिंटू चव्हाण (वय २२, रा. विघ्नहर्तानगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शुभम सोमनाथ कांबळे (वय ३०) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ही घटना बिबवेवाडी स्मशानभूमीच्या मुख्य गेटसमोर २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. फिर्यादी कृष्णा भारत चौतमहाल, त्यांचा मामाचा मुलगा शुभम कांबळे आणि इतर मित्र गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी प्रदीप कश्यप व त्याचे साथीदार मोटारसायकलवरून तेथे आले. त्यांनी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून शुभम कांबळे याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तसेच, ‘याला आज जिवंत सोडायचे नाही,’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर आरोपी वेगवेगळ्या मार्गाने दोन मोटारसायकलींवरून पळून गेले. बिबवेवाडी पोलिस आरोपींचा शोध घेत असताना ते धायरीकडे गेल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तीन तपास पथके तयार करण्यात आली. या पथकांनी धायरी गावातील लॉज, मंदिरे आदी ठिकाणी शोध सुरू केला.

त्यावेळी पोलीस अंमलदार संजय गायकवाड, शिवाजी येवले आणि सुमित ताकपेरे यांना आरोपी धायरेश्वर मंदिरात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास आरोपींना धायरेश्वर मंदिरातून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर चौघांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सूरज बेंद्रे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, अय्याज दड्डीकर, संजीव कळंबे, दत्ता शेंद्रे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, सुमित ताकपेरे आणि रक्षित काळे यांनी केली आहे.