आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रक्षाबंधनाची येरवडा पोलिसांकडून अनोखी भेट

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 29, 2026
Spread the love

पुणे : नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन शोधून येरवडा पोलिसांनी १९ मोबाईल परत मिळविले. रक्षाबंधनाच्या दिवशी या नागरिकांना येरवडा पोलिसांनी अनोखी भेट दिली. रक्षाबंधनाच्या दिवशी येरवडा पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात हे मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्यात आले.

केंद्र शासनाच्या सीईआयआर प्रणालीचा वापर करून जास्तीत जास्त फोन शोधण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार शैलेश वाबळे यांनी हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल फोनसंबंधीचा डाटा तयार करून त्याचा तांत्रिक तपास केला. त्यानुसार नागरिकांचे हरविलेले व चोरीस गेलेले मोबाईल फोन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये वापरात असल्याचे तांत्रिक तपासातून निदर्शनास आले.

या मोबाईल फोन वापरकर्त्यांशी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून मे २०२६ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत २ लाख २५ हजार रुपये किमतीचे एकूण १९ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले आहे. यामध्ये परिमंडळ ४ कार्यालयातील पोलीस अंमलदार गोकुळ घुले यांनी मोबाईल टॉवर लोकेशन व सीडीआर पुरविण्याचे काम केले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे व गोकुळ घुले यांनी केली.