‘महाराष्ट्रापेक्षा कोणीही मोठे नाही’, आक्षेपार्ह घोषणांविरोधात महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचा पुढाकार
“कोण आला रे, कोण आला-महाराष्ट्राचा बाप आला” या घोषणेवर कारवाईची मागणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राजकीय नेते अथवा त्यांच्या समर्थकांकडून उत्साहाच्या भरात दिल्या जाणाऱ्या “कोण आला रे, कोण आला-महाराष्ट्राचा बाप आला” अशा आक्षेपार्ह घोषणांविरोधात महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने पुढाकार घेतला आहे. अशा घोषणांमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि कोट्यवधी महाराष्ट्रवासीयांच्या स्वाभिमानाचा अवमान होत असल्याचे नमूद करत, संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांची भूमी आहे.
कोणतीही व्यक्ती, राजकीय नेता अथवा पदाधिकारी महाराष्ट्रापेक्षा मोठा असू शकत नाही. एखाद्या व्यक्तीचा उल्लेख ‘महाराष्ट्राचा बाप’ असा करणे हे राज्याच्या गौरवशाली परंपरेचा अवमान करणारे असून, त्यामुळे जनभावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडत्या नेत्याबद्दल प्रेम, आदर आणि समर्थन व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, असे समर्थन व्यक्त करताना महाराष्ट्राच्या नावाचा अवमान होणार नाही आणि सार्वजनिक सभ्यतेच्या मर्यादांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याची भूमिका महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने मांडली आहे.
मागणी कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नाही- ही भूमिका कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नसून, महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी असल्याचे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे संपादक अभिजीत डुंगरवाल यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान करणाऱ्या घोषणांविरोधात जनजागृती करण्याबरोबरच, या विषयाला कायदेशीर स्वरूप मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने व्यक्त केला आहे.
“व्यक्ती कितीही मोठी असली, तरी ती महाराष्ट्रापेक्षा मोठी असू शकत नाही. आपल्या नेत्याचा जयजयकार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; परंतु त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान होणारी भाषा वापरणे योग्य नाही. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी शासनाने कठोर आणि निष्पक्ष भूमिका घ्यावी.” – अभिजीत डुंगरवाल, संपादक, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
