आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना शशी थरूर यांच्या हस्ते ‘ग्लोबल व्हिजनरी एज्युकेशनिस्ट, देशभक्त आणि संवेदनशील नेतृत्व’ पुरस्कार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 3, 2026
Spread the love

पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘ग्लोबल व्हिजनरी एज्युकेशनिस्ट, पेट्रियॉटिक अँड कम्पॅशनेट लीडर’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील आयआयटी दिल्लीच्या रिसर्च अँड इनोव्हेशन पार्कमधील सभागृहात आयोजित ‘इंडिया@२०४७ लीडरशिप, इनोव्हेशन अँड ग्लोबल पॉवर समिट २०२६’मध्ये खासदार आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी अंडर-सेक्रेटरी-जनरल डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आजीवन, मूल्याधिष्ठित आणि सर्वांगीण शिक्षण, चारित्र्यनिर्मिती तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी, कर्मचारी आणि समाजामध्ये देशभक्ती, संवेदनशीलता व शाश्वत मूल्यांची जोपासना करण्यासाठी डॉ. चोरडिया यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण व दीर्घकालीन योगदानाची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

‘नेतृत्व, नवोन्मेष आणि जागतिक प्रभावाच्या माध्यमातून २०४७ च्या भारताचा प्रवास घडविणे’ या संकल्पनेवर आधारित या शिखर परिषदेत विविध क्षेत्रांतील निवडक नेते, नवोन्मेषक, उद्योजक, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, गुंतवणूकदार आणि परिवर्तनाचे शिल्पकार सहभागी झाले होते.

दूरदृष्टीचे नेतृत्व, तंत्रज्ञान व नवोन्मेष, आर्थिक विकास, शिक्षण, जागतिक प्रभाव आणि आंतरराष्ट्रीय मुसद्देगिरी अशा विविध विषयांवर परिषदेत विचारमंथन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे व वक्ते डॉ. शशी थरूर यांनी भारताच्या २०४७ पर्यंतच्या वाटचालीवर व्यापक दृष्टिकोन मांडला. मुत्सद्देगिरी, सार्वजनिक धोरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, साहित्य आणि प्रशासन क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे त्यांनी जागतिक पटलावरील भारताचे बदलते स्थान अधोरेखित केले.

२०४७ पर्यंत भारताला जागतिक प्रभावशाली राष्ट्र म्हणून उदयास आणण्यासाठी आवश्यक नेतृत्व, विचारसरणी आणि संस्थात्मक क्षमतेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

या परिषदेत शिक्षण, उद्योग, सामाजिक विकास आणि कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे सहसचिव डॉ. आलोक कुमार मिश्रा, ॲक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स लिमिटेडचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष मेजर हेमेंद्र कुमार सिंह (निवृत्त), द नारायणी फाउंडेशनचे संचालक आदित्य शुक्ला, फॉक्स मंडलचे वरिष्ठ भागीदार एस. टी. प्रशांता कुमार, संजय स्पीच, हिअरिंग अँड रिहॅबिलिटेशन सेंटरचे संस्थापक संचालक एसएलपी संजय कुमार, ला डेन्सिटे क्लिनिक लिमिटेडचे संस्थापक व संचालक डॉ. गजानन आनंद जाधव, प्लेक्सस न्यूरो अँड स्टेम सेल रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. नईम सादिक तसेच एरिओन भारतचे (एबी जिऑन प्रायव्हेट लिमिटेड) संस्थापक व संशोधन प्रमुख एन. प्रवीण आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया हे शिक्षणतज्ज्ञ, ग्लोबल कोच, उद्योग व व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ, दूरदृष्टीचे नेतृत्व असलेले व्यक्तिमत्त्व आणि समाजसेवक म्हणून परिचित आहेत.

समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी परवडणाऱ्या शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

ज्ञानवर्धक आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरणाच्या माध्यमातून शांतता व सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

जागतिक विचारसरणी आणि भारतीय मूल्यांचा समन्वय साधत त्यांनी शिक्षण क्षेत्रात परिवर्तनवादी दृष्टिकोन विकसित केला आहे. कठोर शैक्षणिक निकषांसोबत नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर करून शिक्षण अधिक प्रभावी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

उद्योग क्षेत्राशी व्यापक संवाद, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सर्वांगीण शैक्षणिक दृष्टिकोनातून आत्मविश्वासपूर्ण, सर्जनशील आणि कृतीशील व्यक्तिमत्त्वांची निर्मिती करण्याचे त्यांचे ध्येय आहे.