चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आयुक्तांचा दणका
डमी तक्रारदाराची तक्रार घेतली नाही : पोलिसांचा भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून तातडीने कसा प्रतिसाद मिळतो, याची पडताळणी करण्यासाठी पाठविलेल्या डमी तक्रारदारांना पोलिसांनी ना दाद दिली, ना त्यांची फिर्याद घेतली. हे वास्तव समोर आले आहे. अशा चार पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दणका दिला आहे. त्यांना अगोदर वार्षिक वेतनवाढ रोखण्यात का येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन ताशेरे ओढण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यावर प्रभारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. खरं तर अनेकदा तक्रारदारांना आपली कैफियत पोलिसांकडे मांडण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात.
कधी-कधी तर एखाद्या पुढाऱ्याचा किंवा पोलीस अधिकाऱ्याचा फोन प्रभारी अधिकाऱ्यांना करावा लागतो. त्याला काही पोलीस ठाणी अपवादही असतील; मात्र, बहुतेक ठिकाणचे हेच वास्तव असल्याचे दिसून येते.
नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवून घेतली जाते का, त्यांना तातडीने प्रतिसाद दिला जातो का आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी जाऊन आवश्यक कार्यवाही करतात का, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी पुणे पोलिसांकडून ६ जून २०२६ रोजी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये डमी तक्रारदार पाठविण्यात आले होते.
या कारवाईत मार्केटयार्ड, अलंकार, स्वारगेट आणि डेक्कन पोलीस ठाण्यांमधील तक्रार निवारणाची पद्धत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणीत आली.
मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात डमी तक्रारदाराने मोबाईल फोन हिसकावून नेल्याची तक्रार केली. मात्र, तेथील पोलिसांनी ऑनलाइन एफआयआर नोंदवून त्याची प्रत सादर करण्यास सांगितले.
अलंकार पोलीस ठाण्यातील प्रकारही वेगळा नव्हता. मोबाईल हिसकावल्याची तक्रार घेऊन गेलेल्या डमी तक्रारदाराची एफआयआर नोंदविण्याची तयारी तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्याने दर्शविली नाही.
घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आणि सीसीटीव्ही तपासण्यात आले; मात्र, पोलीस अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. तर, स्वारगेट पोलीस ठाण्यात वाहन चोरीची तक्रार घेऊन गेलेल्या डमी तक्रारदाराला उद्या या, असे सांगण्यात आले.
तसेच, डेक्कन पोलीस ठाण्यात वाहन चोरीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र, वाहनाची कागदपत्रे घेऊन दुसऱ्या दिवशी बालगंधर्व पोलीस चौकीत तक्रार देण्यास सांगण्यात आले.
त्यामुळे तक्रारदाराची तातडीने नोंद घेण्याऐवजी त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे नाही नियंत्रण :- पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नागरिकांच्या तक्रारींची योग्य दखल घेणे, त्यांची लेखी नोंद करून घेणे आणि अधीनस्थ अधिकारी-अंमलदारांकडून आवश्यक कार्यवाही करून घेणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र, डमी तक्रारदारांच्या प्रकरणात ही जबाबदारी पार पाडण्यात आल्याचे दिसून आले नाही. अधीनस्थ अधिकारी आणि अंमलदारांवर प्रभारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आरोपीला उठाबशा काढायला लावणे पडले महागात :- येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात २० वर्षीय आरोपीला आपत्तीजनक भाषेत सुनावणे, सार्वजनिक माफी मागण्यासह उठाबशा काढण्यास भाग पाडणे आणि दुसऱ्या आरोपीशी अमानुष वर्तन केल्याचे व्हिडीओ समोर आले होते. या प्रकारातून मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याचे चित्र निर्माण झाल्याने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले असून, दोन वर्षांसाठी त्यांची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे.
