महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद
फरासखाना पोलिसांची कामगिरी : ५ गुन्हे उघडकीस, अडीच लाखांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, अडीच लाख रुपयांचे १८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
आरती आकाश चव्हाण (वय २२, रा. मिठमिठा, जि. छत्रपती संभाजीनगर), सुवर्णा रोहित शिंदे (वय ३५) आणि रोहित ऊर्फ दीपक शिंदे (वय ४०, दोघे रा. वरदडा, ता. चिखली, जि. बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत असताना २० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दोन वाट्या व चार मणी असलेले मंगळसूत्र, तसेच आणखी एका महिलेचे ३ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले होते.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस हवालदार गजानन सोनुने व अजिम शेख यांना बातमीवरून दोन महिला व एका पुरुषाची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तिघांना पकडले.
त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने व लोखंडी कटर मिळून आला. त्यांना अटक करून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून २ लाख ५९ हजार १४० रुपयांचे १८ ग्रॅम सोन्याचे दागिने व लोखंडी कटर जप्त करण्यात आला आहे.
चोरीला गेलेला १०० टक्के माल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन, असे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अंमलदार महेश राठोड तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, अजिम शेख, महेश राठोड, नितीन जाधव, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, अमोल अवाड, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, चेतन होळकर, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे, कुंडे, फुपाने यांनी केली आहे.
