ज्वेलरी दुकानाच्या आड गांजा, हुक्का फ्लेवर, ई-सिगारेटची विक्री
विमानतळ पोलिसांची कारवाई : तरुणीला अटक, सव्वा दोन लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फोनवरून ऑर्डर घेऊन गांजा, हुक्का फ्लेवर आणि ई-सिगारेटची विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून विमानतळ पोलिसांनी एका कॉस्मेटिक ज्वेलरी शॉपवर छापा टाकून २ लाख १७ हजार रुपयांचा गांजा, हुक्का फ्लेवर आणि ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. तेथे विक्री करणाऱ्या तरुणीला अटक केली आहे.
अभिलाषा पंकज अहिरराव (वय २२, रा. विमाननगर) असे या तरुणीचे नाव आहे. विमाननगरमधील लुंकड ड्रीमलँड येथील ‘क्लाऊड कार्टल’ या दुकानात बेकायदेशीरपणे ई-सिगारेट व हुक्का फ्लेवरची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून पोलिसांनी या दुकानावर छापा टाकला. दुकानात अभिलाषा अहिरराव ही होती. मागील महिन्यात तिने डेक्कन येथील दुकान बंद करून विमाननगरमध्ये ‘क्लाऊड कार्टल’ नावाचे कॉस्मेटिक ज्वेलरीचे दुकान सुरू केले होते.
या ठिकाणी असलेल्या आयटी कंपन्या, मोठी महाविद्यालये आणि तरुण वर्गाला लक्षात घेऊन हे दुकान सुरू केले होते. या दुकानाच्या आडून ती अवैध व्यवसाय करीत होती.
तिच्या दुकानाची झडती घेतली असता त्यात हुक्का फ्लेवर मिळून आले. तिच्या पर्सची तपासणी केली असता त्यात गांजाच्या पुड्या मिळाल्या. दुकानात कपाटाच्या आड इलेक्ट्रॉनिक काटा आढळून आला.
दुकानासमोर लावलेल्या दुचाकीची तपासणी केली असता त्यात ई-सिगारेट मिळून आल्या. पोलिसांनी २ लाख १७ हजार रुपयांचा गांजा, हुक्का फ्लेवर आणि ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. तिच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई अबिनाश कुमार, सहायक पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश बोलके आणि प्रल्हाद गिते यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, हर्षल घागरे, पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे, लालू कर्हे, रुपेश पिसाळ, अभय नागटिळक, राहुल जोशी, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, प्रशांत सुतार, सागर कासार, प्रणिता थोरात, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे आणि राजीव टोम्पे यांनी केली.
