७० महिला कामगारांना प्रत्येकी १७ हजारांचा दिवाळी बोनस, १० लाखांचे विमासंरक्षणही मिळणार
दि पूना मर्चेंट्स चेंबर आणि हमाल पंचायतचा उपक्रम : पोस्ट खात्यामार्फत विमा योजना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बाजारपेठेतील स्वच्छता आणि इतर कामे करणाऱ्या महिला कामगारांच्या श्रमाचा सन्मान करण्यासाठी दि पूना मर्चेंट्स चेंबर आणि हमाल पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या स्व. डॉ. बाबा आढाव स्त्री कामगार कल्याण योजनेअंतर्गत सुमारे ८७ महिला कामगारांना प्रत्येकी १७ हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्यात आला. तसेच, यावर्षीपासून प्रत्येक महिला कामगाराला पोस्ट खात्यामार्फत वार्षिक १० लाख रुपयांचे विमासंरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत आयोजित महिला कामगारांच्या स्नेहमेळाव्यात भारतीय डाक विभागाच्या पोस्टमास्टर जनरल प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते बोनसचे वितरण करण्यात आले.
या वेळी बोलताना प्रीती अग्रवाल म्हणाल्या की, बाजारपेठेतील दुकाने आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वाचे काम महिला कामगार करतात. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांचा सन्मान करण्याचे काम चेंबर करीत आहे.
हा उपक्रम कौतुकास्पद असून समाजासाठी प्रेरणादायी आहे. महिला कामगारांनी पोस्ट विभागाच्या विविध विमा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरख मेंगडे यांनी चेंबर आणि हमाल पंचायत यांच्यातील सहकार्याचा उल्लेख केला. चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले की, चेंबर आणि हमाल पंचायत यांच्या सहकार्याने गेल्या ३८ वर्षांपासून ही योजना कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय राबविण्यात येत आहे.
व्यापारी बांधवांच्या सहकार्याने महिला कामगारांच्या श्रमाचा सन्मान आणि त्यांचे कल्याण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
या योजनेअंतर्गत बाजारपेठेत धान्य निवडणे, दुकानांची साफसफाई आणि स्वच्छतेची कामे करणाऱ्या महिलांना दरवर्षी दिवाळी बोनस दिला जातो.
कार्यक्रमाला चेंबरचे सचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, प्रविण चोरबेले, उत्तम बाठिया, नवीन गोयल, दिनेश मेहता, संदीप शहा, हरिराम चौधरी, स्त्री कामगार कल्याण योजना समितीचे अध्यक्ष शाम लढ्ढा, उपाध्यक्ष महिपालसिंह राजपुरोहित, मुकेश शहा, सचिन गोयल, किरण गुजर, हमाल पंचायतचे चंद्रकांत मानकर आदी उपस्थित होते.
महिला कामगारांना १० लाखांचे विमासंरक्षण – महिला कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता मिळावी, तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींमध्ये त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने दि पूना मर्चेंट्स चेंबर आणि हमाल पंचायत यांनी संयुक्तपणे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून पोस्ट खात्यामार्फत प्रत्येक महिला कामगाराला वार्षिक १० लाख रुपयांचे विमासंरक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे बाजारपेठेत स्वच्छता, धान्य निवडणे आणि इतर कामे करणाऱ्या कष्टकरी महिलांना आर्थिक सुरक्षिततेचे कवच मिळणार आहे. महिला कामगारांच्या कल्याणासाठी चेंबर आणि हमाल पंचायत यांनी उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
