रिक्षाचालकाच्या डोक्यात पाईपाने मारहाण करून खून
अनैतिक संबंधाचे कारण : वाघोली पोलिसांनी ८ जणांना केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अनैतिक संबंधाच्या कारणावरून रिक्षाचालकाला वाघोली बाजारतळावर बोलावून घेऊन कारने धडक देऊन खाली पाडून लोखंडी पाईपाने डोक्यात मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे.
नवनाथ दिगंबर सोन्नर (वय ३५, रा. चौधरी वस्ती, खराडी) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. नामदेव बाळासाहेब आळनुरे (वय २९, रा. वाकलगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी), कैलास सुधाकर होरे (वय ३२, रा. चौधरी वस्ती, खराडी), बालाजी सोनाजी घनवटे (वय २२, रा. वाकलगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी), अनिल सोपान घनवटे (वय २९, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली), नितीन लक्ष्मण उमाप (वय २१, रा. काळुबाईनगर, वाघोली), रोहन रामचंद्र वाघमारे (वय २२, रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकीजवळ, येरवडा), अर्जुन ज्ञानेश्वर शेलार (वय २०, रा. पूर्वरंगनगर, भावडी रोड, वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ही घटना वाघोली येथील बाजारतळ मैदान येथे २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ सोन्नर हा रिक्षाचालक आहे.
त्याचे नामदेव आळनुरे याच्या नातेसंबंधातील महिलेशी अनैतिक संबंध होते. तिच्याबरोबरील संबंध सोडून देण्याविषयी त्यांनी नवनाथ सोन्नर याला अनेकदा बजावून सांगितले होते.
तरीही त्याने त्यांचे म्हणणे ऐकले नव्हते. या संबंधाचा राग मनात धरून त्यांनी नवनाथ याला बाजारतळ मैदानावर बोलावले होते. नवनाथ बाजारतळ येथील मैदानात आल्याचे त्यांनी पाहिले.
त्यांनी स्विफ्ट कारने त्याला जोरात धडक देऊन खाली पाडले. त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी पाईपने डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले आणि त्याचा खून केला.
याची माहिती मिळताच वाघोली पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्वांना पकडून अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शहादेव हवाले तपास करीत आहेत.
