रिलस्टार दिव्या शिंदेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा
सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला घरात शिरून केली मारहाण : ५ लाखांची खंडणीची मागणी करुन केली तोडफोड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिग बॉस फेम रिलस्टार दिव्या शिंदे हिने निमंत्रण नसताना बालगंधर्व रंगमंदिरातील ‘कला आविष्कार महोत्सवा’त येऊन सहभाग घेतल्याबद्दल ५ लाख रुपयांची मागणी केली होती. कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात शिरून त्यांना मारहाण करून ५ लाख रुपयांची खंडणी मागून तोडफोड केल्याप्रकरणी रिलस्टार, ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेसह तिघांवर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महंमदवाडी येथील न्याती हायलँड येथील डॉक्टरांच्या घरी २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
याबाबत डॉ. विद्याधर दादासाहेब गायकवाड (वय ६५, रा. न्याती हायलँड, महंमदवाडी, हडपसर) यांनी काळेपडळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्यावर सध्या ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रिलस्टार दिव्या शिंदे (रा. सनसिटी, सिंहगड रोड), आण्णा ढमढेरे (रा. पिंपरी) आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. विद्याधर गायकवाड हे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधून वैद्यकीय अधिकारी म्हणून २०२१ मध्ये निवृत्त झाले. ते सध्या करुणादीप फाऊंडेशन नावाच्या संस्थेचे सदस्य आहेत.
करुणादीप संस्था शिक्षण, कला इत्यादी क्षेत्रांना प्रोत्साहन देणे व मदत करण्याचे काम करते. करुणादीप संस्थेने १ ते ३ सप्टेंबर २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित केला होता.
यावेळी दिव्या शिंदे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नसतानाही त्यांनी सहभाग घेतला होता. डॉक्टरांनी किंवा संस्थेकडून दिव्या शिंदे यांना या कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले नव्हते.
दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे व इतर दोघे जण १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता डॉक्टरांच्या घरी आले. ते घरी नसताना त्यांनी त्यांच्या पत्नी व मुलाकडे डॉक्टर कोठे आहेत, याची चौकशी केली.
तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने ५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर पत्नी व मुलाला दमदाटी करून ते निघून गेले. कार्यक्रम झाल्याची माहिती दिव्या शिंदे हिला मिळाल्यापासून, म्हणजे ऑगस्ट २०२६ पासून, ती डॉक्टरांना फोन व मेसेज करत होती.
त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी दुपारी आण्णा ढमढेरे याने फोन केला. ते हॉटेल ब्ल्यू नाईन येथे भेटले. “दिव्या ताईचे ५ लाख रुपये द्या, नाहीतर दोन दिवसांत मारहाण करण्यासाठी घरी लोक पाठवू,” अशी धमकी त्याने दिली.
दिव्याचे सीमकार्ड घेण्याचा बहाणा करून आण्णा डॉक्टरांना भेटला होता. त्यावेळी डॉक्टरांनी आपल्याला पॅरालिसिस झाल्याचे सांगितले.
तसेच कार्यक्रम संस्थेने आयोजित केला होता. मी फक्त संस्थेचा सदस्य आहे. माझा पैशांशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
२४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता ते एकटेच घरी होते. प्रथम आण्णा ढमढेरे आला. त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर आण्णाच्या पाठोपाठ दिव्या शिंदे व तिच्यासोबतचे ८ ते १० जण घरात शिरले.
त्यांनी डॉक्टरांना लाथाबुक्क्यांनी तोंडावर, पोटात व पाठीत मारहाण केली. दिव्या शिंदे म्हणाली की, “माझा माणूस पैसे घेण्यासाठी आला होता.
तू का पैसे दिले नाहीस?” असे म्हणत, “याला जिवंत सोडू नका, याला मारून टाका,” असे तिने सांगितले. त्यानंतर तिच्यासोबत आलेल्या एकाने हातातील धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केला.
दिव्या शिंदे म्हणाली, “आम्ही तुला जिवंत सोडणार नाही. तू आता कसा वाचतो ते पाहतो. याला जिवे ठार मारा.” त्यानंतर त्यातील लोकांनी लाकडी दांडके व कंबरेचे बेल्ट घेऊन डॉक्टरांना मारहाण केली.
घरातील लोखंडी पॉटने तोंडावर व मानेवर मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांचा मुलगा ओंकार व सून अपूर्वा हे दोघे घरी आले. त्यांनी ओंकार याला दमदाटी केली.
त्यानंतर, “तुम्ही जोपर्यंत ५ लाख रुपये देत नाही, तोपर्यंत तुमची गाडी घेऊन जाणार आहोत,” असे लिहून घेतले. त्यावर जबरदस्तीने त्यांची सही घेतली.
त्यानंतर त्यांनी घरातील साहित्याची तोडफोड केली. काळेपडळ पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.
