पोलीस अंमलदाराने गोळ्या झाडून केली आत्महत्या
कौटुंबिक वादानंतर घरातून पडले होते बाहेर : निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने सेवा पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आले. निगडीतील ट्रान्सपोर्टनगर बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. कौटुंबिक वादानंतर ते बुधवारी, २३ सप्टेंबर रोजी घरातून निघून गेले होते.
विजय मोतीलाल कोळी (वय ३६) असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत होते. त्यांच्या पत्नी सारिका विजय कोळी यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कोळी हे आरटीपीसी (रेडिओ टेलिफोनिक पोलीस कॉन्स्टेबल) म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोळी घरातून निघून गेले.
त्यानंतर ते घरी परतले नाहीत. जाताना त्यांनी आपल्याबरोबर सरकारी पिस्तूल नेले असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस यंत्रणेने त्यांचा शोध सुरू केला होता.
त्यांचे शेवटचे लोकेशन निगडीतील दुर्गादेवी टेकडी परिसरात आढळल्याने त्या भागात पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली. ड्रोनच्या साहाय्यानेही परिसर पिंजून काढण्यात आला होता.
दरम्यान, शनिवारी सकाळी निगडी ट्रान्सपोर्टनगर येथील बस डेपो परिसरात कोळी यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी सरकारी पिस्तूलही मिळून आले.
प्राथमिक तपासात त्यांनी त्याच पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
