लक्ष्मी रोडवर चोरट्यांचा एसीपीला हिसका
विसर्जन मिरवणुकीत चोरटे सक्रिय : ६ नागरिकांच्या गळ्यातील दागिने लंपास
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत शुक्रवारी चोरट्यांनी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांसह ६ जणांना आपल्या हस्तकौशल्याचे दर्शन घडविले. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन महिला, वृद्धांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय असतात. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ६ जणांच्या तक्रारीवरून फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निवृत्त सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण महादेव बोराटे (वय ६२, रा. समर्थ बंगला, बालेवाडी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील बेलबाग चौकात शुक्रवारी दुपारी सव्वा वाजता विसर्जन मिरवणूक पाहत होते. त्यावेळी गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी हातचलाखीने चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे तपास करीत आहेत.
हार्दिक प्रविण मुंदडा (वय ३०, रा. हिंजवडी) हे २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता लक्ष्मी रोडवरील गणपती चौकात मिरवणूक पाहत होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची, २४ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून नेली.
अनिल विठ्ठल कुंभारे (वय ६१, रा. माळवाडी, हडपसर) हे बेलबाग चौकातील मुलचंद मीलच्या दुकानासमोरील फुटपाथवर शुक्रवारी दुपारी १२ वाजता उभे होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीची, २० ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून नेली.
राहुल भाऊसाहेब पठाडे (वय ३८, रा. भूगाव) हे विसर्जन मिरवणुकीसाठी कुंट चौकात शुक्रवारी सायंकाळी उभे असताना चोरट्यांनी १ लाख रुपये किमतीची, १४ ग्रॅम वजनाची सोनसाखळी नकळत चोरून नेली.
सुमीत शिरीष देशपांडे (वय ३४, रा. आंबेगाव) हे कुंटे चौकात असताना सायंकाळी सव्वापाच वाजता त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली.
अभिषेक सुरेश पोटोळे (वय २३, रा. आंबेगाव पठार) हे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता गुरुजी तालीमजवळ विसर्जन मिरवणुकीचे फोटो काढत असताना एकाचा धक्का लागला. त्यावरून बाचाबाची झाली. त्यानंतर त्याच्या साथीदाराने पोटोळे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरून नेला.
