महापालिकेचा क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात
२० लाखांची मागणी : ५० हजार रुपये घेताना ‘लाचलुचपत’ची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : संपूर्ण पुणे शहर गणेश विसर्जन मिरवणुकीत दंग असताना महापालिकेचे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी मात्र लाचखोरी करत असल्याचे समोर आले आहे. हॉस्पिटलमधील त्रुटी दाखवून रजिस्ट्रेशन रद्द करण्याची भीती दाखवत २० लाख रुपयांची लाच मागून ५० हजार रुपये स्वीकारताना पुणे महापालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०, रा. शुभ गेटवे, विमाननगर) असे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील लाचखोर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांचे विश्रांतवाडी येथील भैरवनगर परिसरात हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येते. हॉस्पिटलमध्ये अनियमितता असल्यासंदर्भात तक्रार अर्ज क्षेत्रीय कार्यालयात आला होता. या अर्जाची चौकशी डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांच्याकडे होती.
१८ सप्टेंबर रोजी चकोर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्या हॉस्पिटलमध्ये पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हॉस्पिटलमधील त्रुटींचे निराकरण करावे, अन्यथा हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी वरिष्ठांना अहवाल पाठवू, असे सांगितले.
अहवाल पाठवायचा नसेल तर २० लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडे असलेले ३० हजार रुपये त्यांनी स्वीकारले आणि उर्वरित रकमेबाबत सोमवारी विचार करून सांगतो, असे सांगितले.
याबाबत तक्रारदार यांनी २१ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. धानोरीतील भैरवनगर येथे २४ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांनी हॉस्पिटलमधील त्रुटी दाखवून त्याबाबत कमीत कमी कारवाई करून वरिष्ठांना नोटीस देण्यास सांगतो, असे सांगितले.
तसेच ‘साहेबांसाठी आणि स्वतःसाठी’ ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या संदर्भात तक्रारदार यांच्याकडून यापूर्वी १५ हजार रुपये लाच म्हणून स्वीकारल्याचे चकोर यांनी मान्य केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी धानोरीतील भैरवनगर येथील तक्रारदार यांच्या हॉस्पिटलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदार यांच्या केबिनमध्ये ५० हजार रुपये लाच स्वीकारताना डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून डॉ. चकोर यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ, पोलीस हवालदार प्रवीण तावरे, वनिता गोरे आणि पोलीस अंमलदार आश्विन कुमकर यांनी केली.
