आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रीलस्टार दिव्या शिंदेला काळेपडळ पोलिसांनी केली अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 28, 2026
Spread the love

पुणे : बिग बॉस मराठी फेम रीलस्टार दिव्या शिंदे हिने निमंत्रण नसताना बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कला आविष्कार महोत्सवात सहभाग घेतल्याचा आरोप आहे. या कार्यक्रमातील सहभागाचे ५ लाख रुपये देण्याची मागणी करत कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात शिरून त्यांना मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि तोडफोड केल्याप्रकरणी रीलस्टार दिव्या शिंदे हिला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे.

दिव्या सुनील शिंदे (वय २५, रा. सनसिटी, सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरात शिरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दिव्या शिंदे हिच्यासह अण्णा ढमढेरे आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेपडळ पोलिसांनी रविवारी दिव्या शिंदे हिला अटक करून न्यायालयात हजर केले.

पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींनी फिर्यादी यांना पॅरॅलिसिस झालेला असतानाही बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.

दिव्या शिंदे हिच्याकडून माहिती घेऊन इतर आरोपींना अटक करायची आहे. तसेच कार्यक्रमातील तिच्या सहभागाबाबतही माहिती घ्यायची आहे.

‘कार्यक्रमाचे पैसे देईपर्यंत तुमची कार आम्ही घेऊन जाणार आहोत,’ अशी नोट आरोपींकडून लिहून घेण्यात आली आहे. त्याबाबत तपास करायचा असून, आरोपीच्या हस्ताक्षराचा नमुना घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

त्यानंतर न्यायालयाने दिव्या शिंदे हिला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.

डॉ. विद्याधर गायकवाड हे सदस्य असलेल्या करुणादीप संस्थेने १ ते ३ सप्टेंबर २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे कला आविष्कार महोत्सव आयोजित केला होता.

यावेळी दिव्या शिंदे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नसतानाही त्यांनी सहभाग घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. डॉक्टर किंवा संस्थेकडून दिव्या शिंदे यांना कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले नव्हते.

असे असतानाही कार्यक्रमात सहभाग घेतल्याच्या मोबदल्यात ५ लाख रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दिव्या शिंदे हिच्यासह ८ ते १० जणांनी डॉक्टरांच्या घरात शिरून तोडफोड केली आणि डॉक्टरांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले.