आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मानसिंग पाटील प्रकरणात संपूर्ण वस्तुस्थितीची निष्पक्ष चौकशी व्हावी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 28, 2026
Spread the love

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह काही पोलीस अधिकारी व अंमलदारांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांनंतर या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती निष्पक्षपणे तपासली जावी. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांची बाजूही तितक्याच गांभीर्याने विचारात घेतली जावी, अशी भूमिका आता पुढे येत आहे.

राज्य मानवी हक्क आयोगाच्या निरीक्षणाच्या आधारे संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले असले, तरी गुन्हा दाखल होणे म्हणजे आरोप सिद्ध होणे नव्हे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा तसेच न्यायालयीन प्रक्रियेत उपलब्ध कायदेशीर संरक्षण घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.

पोलीस अधिकाऱ्यांना अनेकदा खून, गंभीर मारहाण, टोळीयुद्ध आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांमध्ये तातडीने निर्णय घेऊन कारवाई करावी लागते. अशावेळी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा त्यावेळची परिस्थिती, उपलब्ध माहिती, गुन्ह्याचे स्वरूप आणि कायदा-सुव्यवस्थेची आवश्यकता या सर्व बाबींच्या संदर्भात विचार होणे गरजेचे आहे.

मानसिंग पाटील अथवा अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे की नाही, याचा अंतिम निर्णय सक्षम तपास यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच होणे अपेक्षित आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही अधिकाऱ्याला सार्वजनिकरीत्या दोषी ठरविणे योग्य ठरणार नाही.

मानवी हक्कांचे संरक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच गुन्हेगारीविरोधात कायदेशीर कारवाई करणाऱ्या पोलीस दलाचे मनोबल टिकवणेही आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणात सत्य बाहेर यावे, दोषी असल्यास कायद्यानुसार कारवाई व्हावी; मात्र निर्दोष अधिकाऱ्यावर अन्याय होऊ नये, एवढीच न्याय्य अपेक्षा आहे.