आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 28, 2026
Spread the love

पुणे : मालेगावमधील सराईत गुन्हेगारांच्या टोळीने विसर्जन मिरवणुकीत एका दिवसात मोठा डल्ला मारला होता. शिवाजीनगर पोलिसांनी या ११ जणांच्या टोळीला महापालिकेसमोरील खुडे पुलाजवळ पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडले. त्यांच्याकडून शेवरलेट क्रुझ कार, ६३ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, दोन सुरे, कटर, मिरची पावडर असा ३० लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अब्दुल कादीर नूर मोहम्मद (वय २८), अब्दुल मलीक अब्दुल खालीक (वय २२), जियाउल रहेमान शौकत हुसेन (वय २६), मोहम्मद अस्वद मोहम्मद अजमल (वय ३१), फैसल अजीज खान (वय २४), हुजेफा अंजूम मोहम्मद साजीद (वय ३०), जुबेर अहमद मुख्तार अहमद (वय ३५), अजहर अहमद अल्ताफ अममद मोमीन (वय ३०), नावेद अख्तर शफीक अहमद अन्सारी (वय ३३), अतहर अहमद एजाज अहमद (वय २३, सर्व रा. मालेगाव, जि. नाशिक), अतुल मारोती इंगळे (वय २४, रा. गिरोली, जि. वाशीम) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

विसर्जन मिरवणुकीत होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक चोरट्यांच्या टोळ्या पुण्यात सक्रिय असतात. हे चोरटे मुळचे मालेगाव येथील रहिवासी आहेत. विसर्जन मिरवणुकीत २५ सप्टेंबर रोजी अनेक भाविकांचे मोबाईल, सोनसाखळ्या चोरीला गेल्या होत्या. मोबाईल चोरीची तक्रार पोलिसांनी पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’वर देण्यास सांगितले होते.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस पथक जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, झाशीची राणी चौक, महापालिका परिसरात गस्त घालत होते. २६ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, खुडे पुलाजवळील नदीपात्रालगत ७ ते ८ जण हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. शिंदे यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांना कळविली. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अमर काळंगे व निगराणी पथकाने २६ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वा पाच वाजता नदीपात्रालगत या टोळीला चारही बाजूंनी घेराव घालून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ६३ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल तसेच दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मनिषा वलसे, सहायक फौजदार प्रदीप खळदकर, पोलीस अंमलदार गणेश चोबे, तेजस चोपडे, बिडे, वालकोळी, गणेश जाधवर, सावके, वाघ, बेडवाल, भोसले, चोपडे, येसणपुरे यांनी केली आहे.

मालेगावचे सराईत गुन्हेगार
हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी रेल्वेमध्ये चोऱ्या केल्याचे गुन्हे दाखल आहेत. हे सर्व जण मालेगाव येथील रहिवासी असून एकत्रितपणे गुन्हे करतात. ते २५ सप्टेंबर रोजी सकाळी पुण्यात आले होते. विसर्जन मिरवणुकीत एकत्रितपणे मोबाईल चोरून ते सर्व जण परत जाण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी पोलिसांनी छापा घालून त्यांना पकडले. – अरविंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक