विवाहानंतर चार महिन्यांतच नवविवाहितेची आत्महत्या
हुंड्यासाठी छळ : पती, सासू, सासरे यांना काळेपडळ पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : माहेरहून गाडीसाठी ५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी होत असलेल्या सासरच्या छळाला कंटाळून आयटी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियर नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेपडळ पोलिसांनी पती, सासू, सासरे यांना अटक केली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता.
वैष्णवी ओंकार घिसरे (वय २३, रा. वडाचीवाडी) असे या विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील प्रवीण रघुनाथ जरांडे (वय ५१, रा. कोडीत खुर्द, ता. पुरंदर) यांनी काळेपडळ पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पती ओंकार संजय घिसरे (वय २८), सासरे संजय महादेव घिसरे (वय ४९), सासू रुपाली संजय घिसरे (वय ४२) यांना अटक केली आहे. ही घटना वडाचीवाडी येथील वृंदावन सोसायटी येथे २४ सप्टेंबर रोजी रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा विवाह ९ मे २०२६ रोजी झाला होता. विवाहावेळी सुमारे ४५ लाख रुपये खर्च करून १० तोळे सोने दिले होते. त्यानंतरही चारचाकीसाठी ५ लाख रुपयांची मागणी केली जात होती. विवाहानंतर वैष्णवी काही काळ सासरी राहिली. त्यानंतर नोकरीनिमित्त ती बंगळुरू येथे गेली होती. जूनअखेरीस ती पुन्हा पुण्यात आली होती. त्यानंतर तिने वर्क फ्रॉम होम काम सुरू केले होते. या काळात तिला वारंवार त्रास दिला जात होता, असा तिच्या वडिलांनी आरोप केला आहे.
२४ सप्टेंबर रोजी वैष्णवीने आईला फोन करून आपल्याला त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करीत आहेत.
