आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय युवकाचा मृत्यू

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 28, 2026
Spread the love

पुणे : स्टोन क्रेशरवर अल्पवयीन मुलाला कामाला ठेवून त्याला कोणतीही सुरक्षा साधने न पुरविल्याने स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. लोणीकंद पोलिसांनी तिघा स्टोन क्रेशर ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रिन्स विजयसिंग धुर्वे (वय १७) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. दिलीप संभाजी शिळीमकर (वय ४०, रा. साई श्रेया समृद्धी अपार्टमेंट, बावडी रोड, वाघोली), सत्यजित अशोक जना (वय ३५, रा. स्पंदन स्पर्श, बावडी रोड, वाघोली), अमित भगवान अकोलकर (रा. व्हीजन प्रिसा अपार्टमेंट, रावेत, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हवालदार अजित हरीभाऊ कुर्‍हे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना लोणीकंद येथील साई राम स्टोन क्रेशर मशीन येथे १२ सप्टेंबर रोजी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी साई राम स्टोन क्रेशर मशीन ठेकेदारीवर चालविण्यास घेतले आहे. प्रिन्स विजयसिंग धुर्वे हा १७ वर्षांचा आहे, हे माहिती असतानाही त्याला स्टोन क्रेशर मशीनवर कामावर ठेवले आहे. बालकांना धोकादायक व्यवसाय करण्यास प्रतिबंध असताना त्याला कामावर ठेवले. त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने, जसे की सुरक्षा हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी नेट इत्यादी साधने उपलब्ध करून दिली नाहीत. त्यामुळे प्रिन्स धुर्वे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक विलास मोटे तपास करीत आहेत.