लॅबेडोअर श्वानाने युवकाच्या चेहऱ्याचा चावा घेऊन केले गंभीर जखमी
वडगाव शेरीमधील घटना : श्वान मालकिणीवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिल्डिंगच्या मजल्यावर मोकळा सोडलेल्या लॅबेडोअर जातीच्या श्वानाने १४ वर्षीय युवकाच्या चेहऱ्याचा चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केले. चंदननगर पोलिसांनी श्वान मालकिणीवर गुन्हा दाखल केला आहे.
अर्णव विनोद ढुमणे (वय १४, रा. शिंदे बिल्डिंग, वडगाव शेरी) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील विनोद सुदामराव ढुमणे (वय ४२) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी तपस्विनी कुणाल शिंदे (रा. शिंदे बिल्डिंग, वडगाव शेरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वडगाव शेरी येथील शिंदे बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे शिंदे बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर शेजारी-शेजारी राहतात. तपस्विनी शिंदे यांनी लॅबेडोअर जातीचा श्वान पाळला आहे. त्यांनी त्याला बांधून न ठेवता मोकळे सोडले होते.
अर्णव ढुमणे हा युवक घरातून बाहेर आल्यानंतर तेथेच फिरत असलेल्या श्वानाने त्याच्यावर झेप घेत त्याच्या चेहऱ्याचा चावा घेतला. त्यामुळे अर्णव गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्यावर टाके घातले.
पाळीव श्वानाची कोणतीही काळजी न घेतल्याने, त्याला साखळीने न बांधल्याने तसेच त्याच्या तोंडाला कोणतीही पट्टी किंवा मास्क न बांधल्याने त्यांच्या हयगयीमुळे व निष्काळजीपणामुळे श्वानाने युवकाच्या चेहऱ्याचा चावा घेऊन त्याला जखमी केले.
याप्रकरणी तपस्विनी शिंदे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस फौजदार लिंगाण्णा तपास करीत आहेत.
