शाळकरी मुलावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न
दोन अल्पवयीन मुले ताब्यात : आंबेगाव येथील दभाडीमधील आर. जी. सुपर मार्केटसमोरील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शाळेत जात असताना किरकोळ कारणावरून दोघा अल्पवयीन मुलांनी आपल्या वर्गमित्रावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी १४ वर्षांच्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेत वडगाव बुद्रुकमधील घुलेनगर येथे राहणारा १५ वर्षीय शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगावातील दभाडी येथील त्यांच्या शाळेजवळील आर. जी. सुपर मार्केटसमोर २९ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा व आरोपी अल्पवयीन मुले हे नववीत शिकतात. त्यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. फिर्यादी मुलगा शाळेत जात होता. यावेळी त्याच्या वर्गमित्रांनी त्याला अडविले आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर ते दोघे पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या या मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी पसार झालेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांना येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पवार तपास करत आहेत.
