आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर अटकेत

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 30, 2026
Spread the love

पुणे : पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने बनावट नियुक्तीपत्रे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी जेजुरीतील श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर यांना शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. खेडेकर यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पुणे महापालिकेतील बनावट भरती प्रक्रिया गैरव्यवहार प्रकरणात खेडेकर यांच्यासह शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बनसोडे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

याबाबत महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी फिर्याद दिली होती. महापालिकेत विविध पदांवर नोकरी लावण्याच्या आमिषाने बेरोजगार तरुणांकडून मोठ्या रकमा घेण्यात आल्या.

त्यात किमान १४ जणांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्याकडून जवळपास २ कोटी ७५ लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे. मे २०२२ ते मे २०२५ दरम्यान महापालिका परिसरासह विविध ठिकाणी हा कथित गैरव्यवहार करण्यात आला होता.

त्यासाठी महापालिकेचे बनावट पत्र, शिक्के आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून नियुक्तीपत्रे तयार करण्यात आली होती.

उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. बनावट ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि वेतन पत्रिका देण्यात आल्या होत्या.

काही उमेदवारांच्या खात्यात वेतन जमा करण्यात आल्याचे भासविण्यात आले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. सुरुवातीला या प्रकरणात ४५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

तपासात तक्रारदार तरुण समोर आल्यानंतर फसवणुकीची व्याप्ती वाढली. गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडेकर पसार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता.

या प्रकरणात खेडेकर यांना मंगळवारी अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता, तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिली आहे.