बनावट दाखले तयार करून जातीचा दाखला मिळविला
शासकीय योजनांचा घेतला लाभ : बंडगार्डन पोलिसांनी केला गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामपंचायतीचे रहिवासी दाखले तयार करून, बनावट कागदपत्रांचा वापर करून शिधापत्रिका, जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करून शासकीय योजनांचा लाभ घेतल्याच्या आरोपातून एकावर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या पोलीस उपअधीक्षक सई भोरे पाटील यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ज्ञानेश्वर बबन शेळके (रा. महाळुंगे, ता. मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील कोलतावडे ग्रामपंचायतीचे सरपंच व विठ्ठल मारुती शेळके यांनी ज्ञानेश्वर बबन शेळके यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज केला होता.
त्यात ज्ञानेश्वर बबन शेळके हे कोलतावडे येथील रहिवासी नसून त्यांनी विठ्ठल मारुती शेळके यांच्या कुटुंबातील पुरावे जोडून बोगस जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून सरकारी सेवेचा लाभ घेत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
याची सत्यता पडताळणी करण्यासाठी समितीने हे प्रकरण २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस दक्षता पथकाकडे हस्तांतरित केले होते.
चौकशीमध्ये ज्ञानेश्वर बबन शेळके यांनी कोलतावडे येथील ८-अ उतारा बनावट तयार केला. तसेच बनावट शिक्क्याचा वापर करून रहिवासी दाखले तयार केले.
त्याचा वापर करून शिधापत्रिका व जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्यानंतर विठ्ठल मारुती शेळके यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या शालेय व महसूल नोंदी वापरून ५ मार्च २०१६ रोजी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले असल्याचे दिसून आले. तसा सविस्तर अहवाल १९ जून २०२६ रोजी समितीस सादर करण्यात आला.
त्यानंतर समितीने सुनावणी घेऊन २२ सप्टेंबर २०२६ रोजी निर्णय दिला. त्यामध्ये ज्ञानेश्वर बबन शेळके यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कोळी महादेव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे सिद्ध झाले आहे.
त्यामुळे त्यांचा कोळी महादेव अनुसूचित जमातीचा दावा अवैध ठरविण्यात आला आहे. त्यांचा दाखला रद्द व जप्त करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने सई भोरे पाटील यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी फिर्याद दिली आहे.
ज्ञानेश्वर बबन शेळके यांनी रहिवासी दाखला असे लेटर असलेला, त्यांच्या पत्नी सुरेखा ज्ञानदेव शेळके यांचा फोटो असलेला आणि त्यावर कोलतावडे ग्रामपंचायतीचा बनावट गोल शिक्का असलेला रहिवासी दाखला तयार केला. त्यावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या १२ जुलै २०१६ रोजीच्या बनावट सह्या व शिक्के तयार करण्यात आले होते.
हा दाखला खोटा असल्याची माहिती असतानाही दोन्ही दाखले खरे असल्याचे भासवून ते शासकीय कार्यालयात सादर करण्यात आले आणि त्याचा वापर करून शासकीय सेवेत लाभ घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत.
