एकाच पोलीस ठाण्यात एकाच दिवशी दोन हवालदारांवर लाचेची कारवाई
शिरूर पोलीस ठाणे : एका पोलीस हवालदाराला अटक, तर दुसरा गेला पळून
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या एकाच पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली. एकाच दिवशी, एकाच पोलीस ठाण्यात दोन वेळा कारवाई होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. एका कारवाईत ११ हजार रुपये घेताना पोलीस हवालदाराला पकडण्यात आले. दुसऱ्या कारवाईत ९५ हजार रुपयांची लाच घेऊन पोलीस हवालदार पळून गेला आहे.
शिवाजी ज्योतीराम बनकर (वय ४४, रा. स्वप्नपूर्ती निवास, घोलेगाव रोड, शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार व त्यांच्या आई-वडिलांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात १९ ऑगस्ट २०२६ रोजी अतिक्रमण करून मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर याच्याकडे आहे. तक्रारदार व त्यांच्या आई-वडिलांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार बनकर याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने अटकेच्या भीतीने बनकर याला ५ हजार रुपये दिले. बनकर याने उर्वरित १० हजार रुपये घेण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी बोलावले असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला २९ सप्टेंबर रोजी मिळाली.
या तक्रारीची त्याच दिवशी जुने शिरूर पोलीस ठाण्यात पडताळणी करण्यात आली. त्यात तक्रारदाराकडून ४ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित ११ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
जुने शिरूर पोलीस ठाण्यात ३० सप्टेंबर रोजी सापळा रचून तक्रारदाराकडून ११ हजार रुपये स्वीकारताना हवालदार बनकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
या दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण तावरे, पोलीस अंमलदार बाळासाहेब गदादे, अभंग ऋषिकेश अभंग तसेच पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे, पोलीस अंमलदार अश्विन कुमकर, विकास आडके, पोलीस हवालदार सोनवणे यांनी केली आहे.
लाचेचे ९५ हजार रुपये घेऊन हवालदार पळाला
सतीश नाथाराव मुंढे (वय ४६) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. शिरूर पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सतीश मुंढे याच्याकडे आहे. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी मुंढे याने १ लाख रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार ३० सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली.
शिरूर पोलीस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलीस चौकीत या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तेव्हा सतीश मुंढे याने स्वतःसाठी व वरिष्ठांच्या नावाने सुरुवातीला १ लाख रुपये व नंतर तडजोडीअंती ९५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी रात्री टाकळी हाजी पोलीस चौकी येथे सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून सतीश मुंढे याने ९५ हजार रुपये स्वीकारले. त्याचवेळी त्याला सापळा पथकाची चाहूल लागली. लाचेची रक्कम घेऊन तो पळून गेला आहे. त्याचा शोध घेतला जात असून, शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
