आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दाम्पत्याला लुटून पळून जाणारे तिघे गुन्हेगार जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 1, 2026
Spread the love

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी येत असलेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला धमकावून त्यांना लुटणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांनी पळून जाताना वाटेतच अडवून पकडले.

तौहिद अस्लम शाह (वय २३), सुलेमान यासीन शेख (वय २१), रोहित बबलू सिंग (वय २०, तिघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

याबाबत दादासाहेब तुळशीराम रासकर (वय ४६, रा. बांडेवाडी, खेडशिवापूर) यांनी आंबेगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना जुन्या कात्रज बोगदा घाटात सातारा ते पुणे मार्गावर २९ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गेली १० वर्षे दर चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी येतात. मंगळवारी ते नेहमीप्रमाणे पहाटे पत्नीसह मोटारसायकलवरून पुण्याकडे येत होते. कात्रजचा जुना बोगदा ओलांडल्यानंतर आरोपींनी त्यांना अडवून त्यांच्या गाडीची चावी काढून घेतली. पत्नीच्या गळ्यातील १ लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावले.

पत्नीचे मंगळसूत्र या चोरट्यांनी हिसकावून घेतल्यानंतरही ते त्यांचा पाठलाग करत होते. नेकलेस पॉइंटजवळ त्यांनी महिलेकडील पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाठीमागून एक कार आली. त्यांनी हा प्रकार पाहून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते तेथून पुण्याकडे पळून जाऊ लागले.

ही बाब आंबेगाव पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी गंधर्व लॉनसमोर गाड्या आडव्या लावून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी एका गाडीला धडक दिली. पोलिसांनी त्यांना जागेवरच पकडले. चोरलेले मंगळसूत्र जप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तपास करीत आहेत.