आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पत्नीशी बोलल्याच्या संशयावरून युवकाला मारहाण

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 1, 2026
Spread the love

पुणे : १७ वर्षांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका दाम्पत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एका महिलेसह चौघांना अटक केली आहे. पत्नीसोबत बोलत असल्याच्या संशयातून या युवकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो पळून जात होता. त्यावेळी इतर आरोपींनी त्याचा पाठलाग केला. मंगळवारी (दि. २९) सकाळी साडेआठच्या सुमारास चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीत युवकाचा मृतदेह मिळून आला होता.

दरम्यान, पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, इतर बाबी देखील पडताळून पाहिल्या जात आहेत. तो पळताना नदीत पडला की त्याच्यासोबत घातपात झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

आकाश रेड्डी, स्वाती रेड्डी, गौरव शिंदे, आशिष चाबुकस्वार (सर्व रा. ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आनंद रेड्डी, सुरज उर्फ चर्‍या मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मुलाच्या आईने फिर्याद दिली आहे. शिवकुमार बाबू वखरानी (वय १७ वर्षे, रा. ताडीवाला रस्ता, पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार शनिवारी २६ सप्टेंबर रोजी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान घरातून बेपत्ता झाला होता. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून त्याला पळवून नेल्याची तक्रार त्याच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिवकुमारचा शोध सुरू केला होता.

पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीपात्रात एका मुलाचा मृतदेह आढळून आला. चौकशीनंतर हा मृतदेह शिवकुमारचा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आकाश रेड्डी याला शिवकुमार हा आपल्या पत्नीसोबत बोलत असल्याचा संशय होता. त्यातूनच आकाश याने शनिवारी रात्री शिवकुमार याला दुचाकीवरून बंडगार्डन बंधारा येथील बर्निंग घाट परिसरात आणले होते. यावेळी आकाश याची पत्नी स्वातीदेखील बरोबर होती. इतर आरोपी पाठीमागून तेथे आले.

आकाश याने शिवकुमारच्या कानशिलात लगावली. त्यामुळे तो घाबरून पळून गेला. यावेळी आरोपींनी त्याचा पाठलाग केला. पळून जात असताना शिवकुमार नदीपात्रात पडला की त्याच्यासोबत घातपात झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक केली आहे. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करीत आहेत.