उरुळी देवाचीमधील सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा
दोघांना अटक : सुगंधित तंबाखूसह बनावट अमूल चीजचा साठा जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उरुळी देवाची येथील सुगंधित तंबाखू, जर्दा बनविणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली. या कारखान्यातून सुगंधित तंबाखू, पॅकिंग मशीन, अमूल चीज, इतर साहित्य असा ३१ लाख ९१ हजार ६०८ रुपयांचा माल जप्त केला आहे. तंबाखूसोबत बनावट अमूल चीजही तयार करत असल्याचे आढळून आले आहे.
सुशिलसिंग विश्वनाथ तोमर (वय २६), उमेशसिंग समदिन तोमर (वय २३, दोघे रा. आदर्शनगर, उरुळी देवाची, ता. हवेली, मूळ रा. तारेनी, मोरेना, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकातील पोलीस अंमलदार नासिर देशमुख, सुधीर सोनवणे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, उरुळी देवाची येथे सुगंधित तंबाखू बनविण्याचा कारखाना सुरू आहे.
या माहितीच्या अनुषंगाने शहानिशा करून पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सरकटे, पूजा बगाडे व मोहिते यांच्यासह उरुळी देवाची येथील आदर्शनगरमधील घरावर ३० सप्टेंबर रोजी छापा घातला.
तेथे सुशिलसिंग तोमर आणि उमेशसिंग तोमर हे दोघे मिळून आले. तेथे सुगंधित तंबाखूने भरलेले ५९ बॉक्स, पाऊच पॅकिंग मशीन, रोज वॉटर, मेंथॉल बॉक्स, ग्लिसरॉल कॅन आणि अमूल चीजचे तब्बल १०८० डबे आढळून आले. सुगंधित तंबाखूसोबत बनावट अमूल चीज बनवत असल्याचे उघडकीस आले आहे. फुरसुंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान पवार, सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस अंमलदार नासिर देशमुख, सुधीर सोनवणे, अमर चव्हाण, प्रताप गायकवाड, अकबर शेख, परमेश्वर कदम, शहाजी काळे, राहुल गोसावी, राहुल ढमढेरे, नेत्रिका अडसुळ, जयश्री भालेराव, मयुरी पालवे, श्रीदेवी फाळके तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी नारायण सरकटे, पूजा बगाडे, मोहिते यांनी केली आहे.
