विद्यार्थी आंदोलनामुळे वाहतुकीत बदल
शास्त्री रोड, एस. एम. जोशी पूल : पर्यायी मार्गाने जाण्याचे पोलिसांचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी पेठेतील लालबहादूर शास्त्री रस्ता परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
‘एमपीएससी’च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील पत्रकार भवन परिसरात आंदोलन सुरू केले आहे. वाहनचालकांनी लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील गांजवे चौकातून पत्रकार भवनमार्गे एस. एम. जोशी पुलाकडे जाऊ नये.
या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले.
नवी पेठेतील पत्रकार भवन परिसरातून एस. एम. जोशी पुलामार्गे कर्वे रस्ता, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना, तसेच कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलीस चौकी चौकातून म्हात्रे पुलामार्गे इच्छितस्थळी जावे.
पूना हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वाहनांनी शक्यतो पत्रकार भवन, एस. एम. जोशी पूल या रस्त्याचा वापर करू नये. या भागातील वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत.
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
