आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मोबाईल फॉरमॅट झाल्याने तरुणाला मारहाण

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 2, 2026
Spread the love

पुणे : व्हिडिओ एडिट करीत असताना मोबाईल फॉरमॅट झाल्याने सर्व डेटा डिलिट झाल्यामुळे तरुणाला मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यावर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत क्षितीज सागर पवार (वय २०, रा. साई कॉम्प्लेक्स, तपकीर गल्ली, बुधवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी पृथ्वीराज गजानन पंडीत (वय ३०, रा. तपकीर गल्ली, बुधवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तपकीर गल्ली आणि नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकात २९ सप्टेंबर रोजी साडेबारा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी क्षितीज पवार यांनी व्हीएफएक्स अ‍ॅनिमेशनची पदवी प्राप्त केली आहे. ते लोकांचे व्हिडिओ एडिट करून देतात.

त्यांनी गणेशोत्सवापूर्वी पृथ्वीराज पंडीत यांचे वैयक्तिक कामाचे व्हिडिओ एडिट करून दिले होते. त्याचे पैसे त्यांनी दिले नव्हते. २८ सप्टेंबर रोजी पृथ्वीराज पंडीत यांनी क्षितीज पवार यांना फोन करून कसबा गणपती कमानीजवळ बोलावून घेतले.

त्यांनी पैसे मागितल्यावर एक व्हिडिओ एडिट करायला दिला. त्यांच्या अ‍ॅपल मोबाईलवर व्हिडिओ एडिट करत असताना नजरचुकीने त्यांचा मोबाईल फॉरमॅट झाला होता.

पृथ्वीराज पंडीत रागावतील, म्हणून त्यांनी त्यांना मोबाईल फोन देऊन रात्री दीड वाजता घरी निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी २९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पृथ्वीराज पंडीत हे पवार यांच्या घरी आले.

माझा मोबाईल फॉरमॅट का केला, असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. घराच्या दरवाज्याजवळ असलेली तांब्याची बाटली घेऊन डोक्यात मारले. लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली.

त्यावेळी पवार यांनी आपण जे. एम. रोडवर जाऊन डेटा रिकव्हर करून घेऊ, असे सांगितले. ते जे. एम. रोडवरील दुकानात गेले. तेथे डेटा रिकव्हर झाला नाही.

तेथून ते पत्र्या मारुती चौकात आले. तेथील दुकानदाराने थोडा वेळ लागेल, असे सांगितले. त्यावर पृथ्वीराज पंडीत याने चिडून दुकानाबाहेर येऊन बाजूला पडलेला लाकडी बांबू घेऊन पवार यांना मारहाण केली.

तेथून ते परत घरी आले. तेव्हाही त्यांनी पुन्हा मारहाण केली. क्षितीज पवार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पृथ्वीराज पंडीत यांच्यावर यापूर्वी विनापरवाना दहीहंडी साजरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे तपास करीत आहेत.