मारहाण करून दोघा तरुणांना लुटण्याच्या दोन घटना
बाणेर रोड, ससून रुग्णालय गेटसमोरील बसस्टॉप : ६ जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मध्यरात्रीच्या सुमारास घरी जात असलेल्या दोघा तरुणांना अडवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम जबरदस्तीने लुटून नेण्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. याबाबत बाणेर व बंडगार्डन पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशाल सुभाष मगदुम (वय ३२, रा. पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पॅनकार्ड क्लब रोडवर १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वादोन वाजता घडला.
फिर्यादी हे हातात दोन बॅगा व पाठीवर सॅक असताना चालत जात होते. त्यांच्यासमोरून मोटारसायकलवरून आलेले दोन व पाठीमागून आलेले दोन, अशा चौघांनी त्यांना मारहाण करून १ लाख २२ हजार ९९९ रुपयांचे हातातील ब्रेसलेट व सोनसाखळी तसेच ऑनलाइन जबरदस्तीने १८ हजार ९९९ रुपये ट्रान्सफर करून घेतले. सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करीत आहेत.
कामगाराला धमकावून लुबाडले – ससून रुग्णालयाच्या परिसरात एका मजुरी करणाऱ्या तरुणाला धमकावून त्याच्याकडील ७ हजार रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली. याबाबत हरीराम चेलाराम चौधरी (वय ३९, रा. सदानंद शेट्टी, मालधक्का चौक, मंगळवार पेठ) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजता ससून हॉस्पिटल गेटजवळील पीएमपी बसस्टॉपजवळून घरी पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघे जण आले. त्या चोरट्यांनी चौधरी यांची गचांडी पकडली. दुसऱ्याने त्यांच्या पँटच्या खिशातील पाकीट व ७ हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.
