वानवडीत वकिलांवर जीवघेणा हल्ला
मुलाच्या दुचाकीचा धक्का बुलेटला लागल्याचे कारण : चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रस्त्याने जाताना मुलाच्या दुचाकीचा बुलेटला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात चौघांनी मारहाण करून वकिलाच्या डोक्यात वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वानवडी पोलिसांनी बुलेटचालकासह चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
लतीफ अब्दुल रहमान (वय ५२, रा. हेरिटेज सोसायटी, कमेला कोंढवा) असे जखमी झालेल्या वकिलाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा हुजेब लतीफ शेख (वय २२, रा. कमेला कोंढवा) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना वानवडीतील केदारीनगर येथील शहीद अशोक कामठे उद्यानासमोरील रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुजेब शेख व त्यांचे आई-वडील कॅन्टोन्मेंट न्यायालयातून वेगवेगळ्या दुचाकींवरून घरी जात होते. यावेळी हुजेब शेख यांच्या दुचाकीसमोर बुलेटचालकाने बेशिस्तपणे गाडी चालवत आपली दुचाकी आणली.
त्यामुळे त्यांच्या दुचाकीचा मागून बुलेटला धक्का लागला. बुलेटचालकाने हुजेब शेख यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. लतीफ शेख यांनी हे पाहून आपली गाडी थांबवली.
तेथे येऊन त्यांनी, “मुलाला का मारहाण करता? आम्ही वकील आहोत,” असे विचारले. त्यावर बुलेटचालकाने, “वकील आहे तर तोफ आहे का? मी तुम्हाला ढगात पाठवतो,” अशी धमकी दिली.
त्यानंतर त्याने साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. साथीदार आल्यानंतर चौघांनी लतीफ शेख यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
लतीफ शेख यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पुणे बार असोसिएशनच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयात जाऊन लतीफ शेख यांची भेट घेतली.
या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
वानवडी पोलिसांनी बुलेटचालकासह चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर जानराव तपास करीत आहेत.
