बनावट कागदपत्रांद्वारे फायनान्स कंपनीला घातला गंडा
जीआयसी हाऊसिंग फायनान्सची फसवणूक : अनेकांना गंडा घालण्याचा होता प्लॅन, चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आंबेगाव येथील स्काय पार्क सोसायटीतील मिळकतीचे खरेदी दस्त, डिमांड लेटर इत्यादी बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवून जीआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून कर्ज मंजूर करून घेत ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींचा इतर अनेक फायनान्स कंपन्यांची फसवणूक करण्याचा प्लॅन होता. हा प्रकार पहिल्यांदाच उघडकीस आल्याने इतर फायनान्स कंपन्या फसवणुकीपासून वाचल्या आहेत.
जीआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक संदीप सिद्धरामअप्पा बेलम (वय ३७, रा. विवा सरोवर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी नंदू शिवराम जगताप (वय ४२, रा. आराध्यम सोसायटी, दत्तनगर, डुडुळगाव, मोशी), स्कायलाईन डेव्हलपर्सचे भागीदार बाबासाहेब चंद्रकांत कुटे (वय ४५, रा. मानाजीनगर, नऱ्हे रोड), निलेश दादाभाऊ बेंद्रे (रा. यशवंतनगर, चंदननगर, खराडी) आणि प्रसाद शिवशरण निरोळी (वय ३४, रा. संपदा रेसिडेन्सी, सातववाडी, गोंधळेनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार जीआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या दीप बंगला चौक येथील कार्यालयात जुलै २०२६ पासून आजपर्यंत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू जगताप यांनी जीआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीमध्ये कर्जमंजुरीसाठी अर्ज केला होता.
त्यांनी स्काय पार्क सोसायटी येथील मिळकतीच्या खरेदीखताचा मसुदा बँकेत आणून दिला होता. मूळ कागदपत्रे जमा केल्यानंतर त्यांनी स्कायलाईन डेव्हलपर्सचे अधिकृत प्रतिनिधी प्रसाद निरोळी हे डिमांड लेटर देतील, असे सांगितले.
३७ लाख १३ हजार ३०३ रुपयांचा कर्जाचा धनादेश प्रसाद निरोळी यांच्याकडे देण्यात आला. हा धनादेश ११ ऑगस्ट २०२६ रोजी वटल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर नंदू जगताप यांनी त्यांच्या मित्रालाही कर्ज हवे असल्याचे सांगून त्याला सोबत आणले. बँकेने त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली.
त्यावेळी कागदपत्रांबाबत संशय आल्याने बँकेने खातरजमा केली. त्यात संबंधित मिळकतीवर दोन बँकांचे कर्ज असल्याचे दिसून आले.
त्यानंतर नंदू जगताप यांच्या मिळकतीबाबत तपासणी केली असता, जगताप यांनी स्काय पार्क सोसायटीतील मिळकतीसंदर्भात जीआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीप्रमाणेच मिटकॉन फायनान्स कंपनी, निवारा फायनान्स बँक, मास हाऊसिंग फायनान्स आणि टू होम फायनान्स कंपनी यांच्याकडेही कागदपत्रे सादर करून कर्जासाठी अर्ज केल्याचे आढळले.
त्यापैकी टू होम्स फायनान्स कंपनीकडून ३५ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे समजले. तसेच, उर्वरित बँकांकडून कर्ज मंजूर करण्यात आले होते; परंतु त्याचे वितरण थांबविण्यात आले होते.
जीआयसी फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेबाबत माहिती घेतली असता, निलेश बेंद्रे यांच्या नावावर हे बँक खाते असल्याचे दिसून आले.
बेंद्रे आणि स्कायलाईन डेव्हलपर्स यांचा कोणताही संबंध नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या आरोपींनी संगनमत करून स्काय पार्क सोसायटीतील मिळकतीचे खरेदी दस्त, डिमांड लेटर इत्यादी बनावट कागदपत्रे तयार करून ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करीत आहेत.
