आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पार्किंगच्या वादातून मारहाण करून जखमी करण्याच्या २ घटना

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 23, 2026
Spread the love

पुणे : पुणे शहरात सध्या वाहनांच्या पार्किंगसाठी जागा शोधणे हे एक दिव्य होऊन बसले आहे. सार्वजनिक जागा आणि सोसायट्यांमध्ये पार्किंगवरून आता वादाचे रूपांतर हातघाईत होऊ लागले आहे. रात्री वाहन पार्क करण्यावरून वादावादी होऊ लागली आहे. सार्वजनिक रस्त्यावरील जागाही अनेकांनी आपल्या मालकीची असल्यासारखी व्यापलेली दिसते. तेथे कोणी दुसऱ्याने वाहन पार्क केले, तर प्रकरण थेट हाणामारीपर्यंत जाते. गाडी लावण्यावरून झालेल्या भांडणात शिवीगाळ करून कारची काच फोडणे आणि तरुणाला मारहाण करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. कोंढवा आणि फुरसुंगी येथे घडलेल्या या घटनांमध्ये पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत योगेश अमृतराव देशमुख (वय ३८, रा. शिवरत्न सृष्टी सोसायटी, हांडेवाडी रोड, सातवनगर) यांनी फुरसुंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी राजेश रमेश डांगी (वय २६), उमेश रमेश डांगी (वय २८), रमेश डांगी (वय ५५) आणि रमेश डांगी यांची पत्नी (सर्व रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, आदर्शनगर, उरुळी देवाची) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना उरुळी देवाची येथील संत ज्ञानेश्वर कॉलनी, आदर्शनगर येथे २१ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे भाऊ शरद देशमुख यांनी रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली होती.

त्यावरून त्यांचा आरोपींशी वाद झाला. आरोपींनी शिवीगाळ करून दोघांना हाताने व लाकडी काठीने मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. शरद देशमुख यांच्या वॅगनआर गाडीची समोरील काच फोडून नुकसान करण्यात आले. पोलीस हवालदार लोणकर तपास करीत आहेत.