रस्त्यावर फटाके उडविल्यास होणार कारवाई
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांकडून नियमावली जाहीर : फटाके उडवायचे कोठे, पुणेकरांसमोर प्रश्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्पुरत्या फटाके विक्रीसह फटाके उडविण्याबाबत नियमावली जारी केली आहे. त्यात सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि रस्त्यापासून १० मीटरच्या आत फटाके उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा या नियमावलीद्वारे पोलिसांनी दिला आहे.
व्यापारी पेठा आणि लक्ष्मी रोड परिसरात लक्ष्मीपूजनानंतर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यात बहुतांश ठिकाणी रस्त्यावर फटाके उडविले जातात.
फटाके उडविण्यासाठी शहराच्या मध्यवस्तीत जागाच नाही. त्यामुळे रस्त्यावर फटाके उडवायचे नाहीत, तर नेमके फटाके उडवायचे कोठे, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
- सरकारने कागदात स्फोटक पदार्थ ठेवलेले व त्याभोवती ४२.५३४ ग्रॅम वजनाचा, ५.७१५ सेंटीमीटर लांबीचा व ३.१७५ सेंटीमीटर व्यासाचा दोऱ्याने गुंडाळलेला, अॅटमबॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादनावर आणि ते जवळ बाळगण्यावर निर्बंध घातले आहेत.
- फटाके विक्रीचे परवाने ६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ पर्यंत देण्यात येणार आहेत. मुदत संपल्यानंतर फटाके अथवा शोभेची दारू विक्री करता येणार नाही. तसेच शिल्लक राहिलेले फटाके अथवा साठा परवानाधारक गोदामामध्ये किंवा घाऊक परवानाधारकाकडे परत करणे आवश्यक आहे.
- पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर, तसेच सर्व गल्ल्यांमध्ये, पदपथांवर (फुटपाथ) किंवा रस्त्यापासून १० मीटर अंतराच्या आत कोणत्याही प्रकारची शोभेची दारू अथवा कोणत्याही नावाने ओळखले जाणारे फटाके फोडणे, सोडणे, उडविणे, तसेच फायर बलून किंवा अग्निबाण उडविणे, या कृत्यांना वर्षभर मनाई आहे.
- रस्त्यांमध्ये महामार्ग, पूल, सेतूमार्ग, नेमलेले मार्ग, सेतू, कमानीवजा घाट, धक्का किंवा कोणतीही आळी अथवा वाट यांचा समावेश होतो. ती रहदारीची असो अथवा नसो, या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल.
- सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाची डेसिबल पातळी निश्चित केली आहे. मोठ्या आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणारा ध्वनी, धूर तसेच विषारी घटकांमुळे होणारे वायुप्रदूषण आणि त्याचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी अशा फटाक्यांवर निर्बंध घालण्याबाबत अंतरिम आदेश दिले आहेत.
- ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी उपकरणे, साधने, सामग्री इत्यादी जप्त करण्यासाठी तसेच दोषी उपकरणे जप्त करण्यासाठी सर्व योग्य पावले उचलावीत.
- एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून चार मीटर अंतरावर १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे.
- ध्वनी निर्माण करून आवाजाचे प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण बंदी घालण्यात येत आहे. मात्र, विविध रंग निर्माण करणारे किंवा सोडणारे आणि आवाज न करणारे फटाके यांच्यावर निर्बंध घालण्याची आवश्यकता नाही. कमी ध्वनी व वायुप्रदूषण करणाऱ्या ग्रीन फटाक्यांचा विचार करण्यात यावा.
- शांतता क्षेत्रात कोणत्याही फटाक्यांचा वापर कोणत्याही वेळी करण्यात येऊ नये. शांतता क्षेत्रामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या सभोवतालच्या १०० मीटरपर्यंतच्या क्षेत्राचा समावेश होतो.
- परवानाधारकांनी विदेशी बनावटीचे फटाके विक्री करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोणताही अपघात अथवा धोका होणार नाही, याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच, वरील नियमांचे उल्लंघन झाल्यास डायल क्रमांक ११२ वर कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
