पाच हजार विद्यार्थ्यांचा रस्ता सुरक्षेचा एल्गार
२५ शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांची कात्रज तलावापर्यंत पदयात्रा : प्रतिभा नाईक हिला श्रद्धांजली
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रस्ता सुरक्षा ही केवळ पोलिसांची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश देत दक्षिण पुण्यातील २५ नामांकित शिक्षण संस्थांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी कात्रजमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृतीचा जागर केला. भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या वतीने कात्रज तलाव फुलराणी मैदानावर विद्यार्थी जनजागृती व शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कात्रज-कोंढवा रस्ता अपघातात जीव गमावलेल्या प्रतिभा ज्ञानेश्वर नाईक या विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तिच्या स्मृतीला अभिवादन करताना भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षेची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी सहभागी २५ शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेपासून कात्रज तलावापर्यंत पदयात्रा काढत नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली.
त्यानंतर कात्रज तलाव परिसरातील उंच तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वाहतूक सुरक्षा शपथ दिली.
रस्त्यावर नियमांचे पालन करणे, स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता जपणे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. या उपक्रमात सहभागी शाळांच्या मुख्याध्यापकांना वाहतूक सुरक्षा शपथपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खेडकर यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी लहान वयापासूनच जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला दक्षिण पुण्यातील शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. मच्छिंद्र खोमणे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुंवर, सहाय्यक महापालिका आयुक्त सुरेखा भणगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झीने, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते वसंत मोरे, नगरसेवक व्यंकोजी खोपडे, प्रकाश कदम, स्वराज बाबर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
