पोलीस हवालदाराचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न
वाय. सी. एम. हॉस्पिटलमधील घटना : खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वाय. सी. एम. हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या वेळी आलेल्या जखमीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी अरेरावी करणाऱ्यांना गोंधळ घालू नका, असे सांगितल्याच्या रागातून तिघांनी पोलीस हवालदाराचा गळा दाबून मारहाण केली. त्यात हवालदार जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संत तुकारामनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले आहे.
वैभव सुभाष साळुंखे (वय ३२, रा. आदर्शनगर, पिंपळे गुरव), कुशाल नैना गोयल (वय २८, रा. पवनानगर, पिंपळे गुरव), सोहेल शब्बीर शेख (वय २७, रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलीस हवालदार अमोल शिंदे यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना वाय. सी. एम. हॉस्पिटलमध्ये २४ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार शिंदे आणि डगवार हे रात्री वाय. सी. एम. हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर होते. वैभव साळुंखे, कुशाल गोयल आणि सोहेल शेख यांनी त्यांचा मित्र कौस्तुभ गुप्ता याला उपचारासाठी वाय. सी. एम. हॉस्पिटलमध्ये आणले होते.
तेथील डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. त्यावेळी हे तिघे डॉक्टरांशी अरेरावीची भाषा वापरून आरडाओरडा करत गोंधळ घालू लागले. तेव्हा अमोल शिंदे आणि डगवार यांनी त्यांना गोंधळ करू नका, असे सांगितले.
त्यावर त्यांनी शिंदे यांना धक्काबुक्की करून गणवेशाची कॉलर पकडली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर अधिक पोलीस मदतीसाठी ते वाय. सी. एम. हॉस्पिटलमधील पोलीस चौकीत गेले.
त्यांच्या पाठोपाठ वैभव साळुंखे हा शिवीगाळ करत आला. पोलीस चौकीमध्ये, ‘‘तुझ्यात किती दम आहे, ते बघतोच. तुला जिवंत सोडत नाही,’’ अशी धमकी देऊन त्याने शिंदे यांचा गळा पकडून दाबून धरला.
त्याने हातातील जाड लोखंडी कडे हाताच्या पंजात पकडून जीवे मारण्याच्या उद्देशाने शिंदे यांच्या तोंडावर ठोसा मारला. त्यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर गंभीर जखम झाली.
त्यावेळी कुशाल गोयल आणि सोहेल शब्बीर शेख यांनी शिवीगाळ करून, ‘‘तू येथे वाचलास; बाहेर भेटल्यास तुला संपवून टाकतो,’’ अशी धमकी दिली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणणे आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
