श्वानप्रेमी सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या आवारात खाण्यास देण्यावरून भांडण : मुंढव्यातील केशवनगरमधील घटना, एकाला अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांना बोलावल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाची तक्रार देऊन परत येत असलेल्या श्वानप्रेमी तरुणाच्या डोक्यात दोघांनी लोखंडी हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुंढवा पोलिसांनी एकाला अटक केली असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
चेतन दिलीप जाधव (वय २५, रा. मुंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत चैतन्य अतुल वज्रमुष्ठी (वय ३१, रा. मोरया क्रिस्टल, लोणकर चौक, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना मुंढवा रोडवरील टोयोटा शोरूमसमोर २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चैतन्य वज्रमुष्ठी हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, ते प्राणीप्रेमी आहेत. ते बाहेरच्या भटक्या कुत्र्यांना सोसायटीत आणून खायला घालतात. त्यावरून सोसायटीमध्ये त्यांची भांडणे झाली होती. त्या भांडणाची तक्रार देऊन ते मोटारसायकलवरून घोरपडीकडे जात होते.
मुंढवा रोडवरील टोयोटा शोरूमसमोर दोघांनी त्यांना अडवले. ‘तू कुत्र्यांसाठी आमच्या घरातील महिलांना मारहाण करतो का?’ असे विचारून त्यांनी चैतन्य यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यावेळी चैतन्य आणि त्यांची पत्नी घाबरून बचावासाठी टोयोटा शोरूमच्या दिशेने पळत असताना, त्यांनी चैतन्य यांना पकडले. खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांची पत्नी त्यांना सोडवण्यासाठी मध्यस्थी करू लागली. तेव्हा त्यांनी तिला दमदाटी करून धक्काबुक्की केली.
पोलिसांनी एकाला अटक केली असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजय कांबळे तपास करीत आहेत.
