आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एल अ‍ॅन्ड टी कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर, कंत्राटदारावर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 24, 2026
Spread the love

पुणे : खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून १४ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याबद्दल एल अ‍ॅन्ड टी कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.

निखिल नितीन साठे (वय १४) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई मंजू नितीन साठे (वय ३०, रा. तळजाई वसाहत) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी एल अ‍ॅन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनोहर मेहेटा व कंत्राटदार यांच्यावर निष्काळजीपणामुळे गंभीर दुखापत झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तळजाई येथील बायोगॅस प्रकल्पाशेजारी महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधलेल्या टाकीत १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल हा १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शाळेतून घरी आला. थोड्या वेळाने तो मित्राबरोबर खेळायला बाहेर गेला. साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्र ओम कसबे याने घरी येऊन निखिल पाण्याच्या टाकीत पडल्याचे कळविले. फिर्यादी, त्यांची सासू व दीर हे पळत तेथे पोहोचले. तोपर्यंत तेथे राहणारे उद्धव लहू कांबळे यांनी अग्निशामक दलाला कळविले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी निखिलला टाकीतून बाहेर काढले. त्यावेळी त्याला उभे राहता येत नव्हते. उपचारासाठी त्याला भारती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या अपघातात निखिलच्या दोन्ही पायांना गुडघ्याखाली फ्रॅक्चर झाले असून, कमरेला मार लागला आहे. तसेच त्याच्या पोटाला व हाताला मार लागला आहे.

घटनास्थळाची पाहणी केली असता, या ठिकाणी कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी लोकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती. संरक्षक जाळी किंवा इशारा देणारा फलकही लावलेला दिसून आला नाही. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील पाणीपुरवठा विभागात जाऊन चौकशी केली. त्यात या टाकीचे काम पुणे महापालिकेने एल अ‍ॅन्ड टी कंपनीला दिले असून, या प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर मनोहर मेहेटा आणि कंत्राटदार काम करत असल्याचे समजले. या माहितीवरून फिर्यादी यांनी प्रोजेक्ट मॅनेजर मनोहर मेहेटा व कंत्राटदार यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश मोरे तपास करीत आहेत.